तरुणाईला इतिहासाचे वेड लावणारे निनाद सर
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आज १० मे म्हणजेच इतिहास संशोधनात ध्रुव ताऱ्यासम अढळ स्थान असणाऱ्या निनाद बेडेकर सरांचा स्मृतीदिन.
निनाद सरांबद्दल काय बोलावं, बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा त्यांचं कौतुक करताना इतिहासातील नाद, निनाद आणि प्रतिसाद असं म्हणलेलं आहे.
इतिहास हा विषयच मुळात रुक्ष. त्यात यामध्ये अभ्यासपूर्ण संशोधन करणारे तर अरसिक होत जातात असा अनेकांचा अनुभव आहे पण त्या अरसिकतेला अपवाद ठरवणारे निनाद सर.
निनाद सरांचा जीवनप्रवास हा आपण याआधीही ऐकला असेलच पण त्यांच्यामुळे किती जणांचे आयुष्य चांगल्या मार्गाला लागले हे कुणीही ऐकलं नसेल म्हणून ती घटना आज तुमच्यासमोर मांडतोय,
तर आज माझी जी इतिहास क्षेत्रात तुमच्यासमोर ओळख आणि इतिहास क्षेत्रात आवड आहे ती फक्त आणि फक्त निनाद सरांमुळे.
गोष्ट 2016, 17 पासूनची होती, कोकाटे खेडेकर वगैरे मंडळींची पुस्तके वाचनात आलेली, प्रॉपर ब्रेनवॉश झाला. ब्राम्हण समाजाला ते टार्गेट करतात म्हणून त्या समाजाविषयी मनात द्वेष निर्माण झाला. द्वेषाची आग मनात कायम भडकत असायची. काय खरं काय खोटं कळत नव्हतं, समोरचा माणूस काहीतरी इतिहास सांगतोय म्हणून आपण ऐकायचं कारण स्वतःचा अभ्यास काही नव्हताच. संदर्भ कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. त्यामुळे समोरील व्यक्ती जे पण काय मनाचा इतिहास सांगतोय ते मान्यच करावं लागायचं.
सुदैवाने 2019 मध्ये यूट्यूबवर निनाद सरांचं व्याख्यान ऐकण्यात आलं. पहिलं व्याख्यान ऐकलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पत्रव्यवहार नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रधर्म.
पत्रव्यवहार वगैरे गोष्टी अस्सल असतात हे तेव्हा नव्याने समजलं. समकालीन संदर्भ इतिहास अभ्यासताना किती महत्वाचे असतात नव्हे नव्हे आत्यंतिक गरजेचेच असतात हे समजले. तटस्थपणा काय असतो हे देखील नव्याने उमगले, त्याचा इतिहास अभ्यासताना किती मोठा वाटा असतो हे कळले.
नंतरुन निनाद सरांची व्याख्यानं हा रोजच्या जीवनाचा भागच बनला. त्यांचं पानिपत या विषयावर केलेलं व्याख्यान ऐकताना जणू काही आपण त्या युद्धमैदानावर प्रत्यक्ष आहोत की काय असं वाटायचं एवढा जिवंतपणा ते व्याख्यानातून उभे करायचे.
प्रतापसूर्य बाजीराव ऐकताना तर थोरल्या बाजीराव साहेबांची धडाडी, कर्तृत्व नव्याने उमगलं आणि बाजीराव साहेबांची जी ओळख होती त्यांच्या नावाची ती आतापर्यंत फक्त मस्तानी पर्यंत ठेवली होती काही लोकांनी ती नव्याने समजली. Timeless management's, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार यांसारख्या कितीतरी विषयांवर निनाद सरांनी उजेड टाकलेला दिसून येतो.
सभासद बखर, शिवभारत, भूषण, परमानंद, राधामाधवविलासचंपू, पर्णालपर्वतग्रहनाख्यान, मनुची, शकावल्या हे शब्द कानावर पडायला लागले. भूषणाला त्यांच्या वाणीतून ऐकणं म्हणजे एकप्रकारे पर्वणीच असायची वीरश्री युक्त असे ते छंद ऐकताना रक्त सळसळ करायचं.
तेव्हा हेच जाणवलं की हा माणूस कुणाचाही द्वेष करत नाहीये तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे जसेच्या तसे सांगतोय अस्सल कागदोपत्रांच्या आधारे.
मग 2019 पासून अस्सल संदर्भ चाळण्यास सुरवात झाली. त्याआधीपर्यंत फक्त इतिहास हा कथा, कादंबरी, नाटकं, सिनेमे, पिवळी पुस्तके यातूनच कळलेला. संदर्भ वाचताना शिवराय जसे समजले होते त्यापेक्षाही मोठे वाटायला लागले.
2020 हे वर्ष तर माझ्यासाठी सुवर्णवर्षं ठरले असं म्हणता येईल lockdown मध्ये तर अनेक पुस्तकं वाचनात आली. मग आलेलं थोडंफार ज्ञान हे इतरांना कळावं म्हणून इतिहासवेड ब्लॉग सुरू केला. प्रतिसाद चांगला येत गेला. नंतर इतिहासवेड समूहाची आपण सुरुवात केली, आपल्या सर्वांशी ओळख झाली. इतिहास क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी ओळखी झाल्या, संपर्क वाढत गेले त्याचं एकमात्र श्रेय जातं ते निनाद सरांना. मी तर म्हणेन की इतिहासवेड आहे ते फक्त निनाद सरांना त्या दिवशी ऐकलं म्हणून.
निनाद सरांशी प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरीसुद्धा ज्यांच्या नुसत्या आवाजाने आमच्या पिढीतल्या तरुणाईला इतिहासाचं वेड लावलं त्यांना घडवलं अशा ज्यांना साक्षात सरस्वती प्रसन्न आहे, ज्यांच्या वाणीतून प्रत्यक्ष अमृत स्त्रवते अशा निनाद सरांना त्यांच्या एका शिष्याकडून ही लेखाद्वारे मांडलेली भावपूर्ण आदरांजली 🌼🙏🚩
- रोहित पेरे पाटील
0 टिप्पण्या