उद्या ०३ एप्रिल, अवघ्या हिंदुस्थानासाठी दुःखाचा दिवस. याच दिवशी अखंड राष्ट्राचे भाग्यविधाते, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज आपली इहलोकीची यात्रा संपवून अवघ्या राष्ट्राला पोरकं करून गेले.
३५० वर्षांनंतरही लोकांच्या मनात अधिराज्य गाजवलेलं एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
मला अनेक जणांनी सुचवलं की महाराजांच्या मृत्यूविषयी ससंदर्भ असा लेख लिहा,
खंत या गोष्टीची वाटतेय की महाराष्ट्रात राहणाऱ्याच अनेकांना शिवछत्रपती महाराजांच्या मृत्यूविषयी माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या लेखणीतून महाराजांच्या मृत्यूविषयी ससंदर्भ लिहून ठेवलंय पण आम्ही ते वाचण्याची तसदी कधी घेतलीच नाही. 
असो विषयांतर होईल, मुख्य मुद्द्यावर येऊ,
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा विषप्रयोगाने झाला त्याचबरोबर तो विषप्रयोग ब्राम्हणांनी किंवा सोयराबाईंनी केला असं मानणारा एक गट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असं मानणारा एक गट आहे, आपण दोन्ही गटाचे संदर्भ आणि सत्यता पडताळून पाहून अखेरीस निष्कर्षाप्रत येऊयात.

आधी आपण महाराजांचा मृत्यू कसा झाला याबद्दल काही संदर्भ बघूयात,

◆ सभासद बखर : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन समजली जाणारी बखर म्हणजे सभासद बखर जी उत्तरकाळात फक्त १५ वर्षांनी लिहल्या गेली. आणि बखरकार कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांच्या जीवनाशी निगडित अनेक घटनांचा साक्षीदार होता यामुळेच या बखरीची विश्वासार्हता वाढते.

'मग काही दिवसांनी राजास व्यथा ज्वराची जाहली. राजा पुण्यश्लोक . कालज्ञान जाणे. विचार पाहता आयुष्याची मर्यादा जाली. असे कळून कारकून व हुजरे लोक होते. त्यामध्ये सभ्य ,भले लोक बोलावून आणिले. सभासदाने कारकून व हुजरे त्याउपरी राजे बोलिले कि “ तुम्ही चुकुर होऊ नका . हा तो मृत्यूलोकच आहे. या मागे किती उत्पन्न जाले , तितके गेले . आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे . आता अवघे बाहेर बसा. आपण श्रींचे स्मरण करतो. “ म्हणोन अवघियांसी बाहेर बसविले. आणि राजीयानी श्री भागीरथीचे उदक आणून स्नान केले. भस्म धारण करून रुद्राक्ष धारण केले. आणि योगाभ्यास करून आत्मा ब्रम्हांडास नेऊन , दशद्वारे फोडून प्राणप्रयाण केले. 
सभासद बखरीत उल्लेखिलेल्या प्रमाणे राजांचा मृत्यू हा ज्वराने झाला म्हणजेच आजारपणामुळे.

◆ चिटणीस बखर
मल्हार रामराव चिटणीस हा उत्तरकालीन आहे, त्याच्या बखरीबाबत अनेक वाद आहेत कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी लिहताना त्याने दुजाभाव केलेला आढळून येतो, कारण पूर्वजांच्या हत्येचा राग मनात असल्याने.
सोयरबाईंना भिंतीत चिणून मारले असं चिटणीस बखरीत नमूद करतो पण इतर कुठल्याही समकालीन साधनांतून तसा उल्लेख येत नाही व मी आधीच सांगितल्या प्रमाणे चिटणीसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी पूर्वग्रहदूषित मनाने लिहले आहे. चिटणीस हा सातारच्या छत्रपतींच्या दरबारात होता, ही बखर उत्तरकालीन आणि वादातीत जरी असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयीचे उल्लेख दुर्लक्षित करण्यासारखे नाही, 

शके १५९६ पासून राज्याभिषेक जालियावरी शके १६०२ पर्यंत याप्रमाणे चरित्र करून असता काही दिवशी ज्वराची व्यथा जाहली . या उपरी आपली अवधी पांच सात दिवस इतकी राहिली म्हणोन सर्व मातबर सरकारकून व सरदार आदी करून जमा जमा करविले . यानंतर महाराजांनी आज्ञा केली की हा मृत्यु लोक ! मोठे मोठे अवतारादिक गेले.! होणारे अवश्यमेव उत्तरकाल तसे होताच असते. ! तुम्ही सर्व प्रराक्रमी आहात कळेल तसे प्रयत्न करून राज्य व धर्म रक्षावा . एक विचारे सार्वानीही चालावे म्हणून सांगून सर्वांचे समाधान केले. आणि बाहेर जवळ बसावे . अशी सर्वांस आज्ञा केली. आणि आपण श्रीगंगोदक आणून स्नान केले. प्रायश्चित्त विधियुक्त करून भस्मधारण रुद्राक्ष-तुलसिमाला धारण केले. आणि दर्भासनी बैसले. शत गोप्रदाने प्रत्यक्ष करून सहस्त्रगोप्रदाने द्रव्याद्वारा संकल्प केला. आणि श्रीदेवाजीचे नामस्मरण अविस्मरणे करून भगवद्गीता व सहस्त्रनामे यांचे पाठ करविले. ब्राम्हणांचे घोष ऐसे होत असता , शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे , चैत्र शुद्ध पोर्णिमा , रविवार उत्तरायण ,दोन प्रहरी देहत्याग करून अवतार समाप्त “ श्रीराम “ ! ऐसे म्हणून केला.

अर्थात बखरीतील अतिरंजितपणा सोडला तर मूळ हकीकत हेच सांगते की राजांचा मृत्यू आजारपणात झाला.

◆  शिवदिग्विजय बखर

ही बखर बरीच उत्तरकालीन आहे म्हणजे लेखनकाळ अज्ञात असून १९ व्या शतकातील ही बखर आहे त्याबरोबरच काही इतिहासकारांच्या मते, ही बखर निव्वळ कल्पनाविलासात्मक कादंबरी असून याचा वास्तवाशी संबंध असेलच असे नाही, ही बखर वाचतानाच हे समजून येईल 

अशी ऐश्वर्यलक्ष्मी विराजमान , त्याठाई बाईसाहेबांचे बुद्धीस अविचार बुद्धी उत्पन्न जाहली आणि विषप्रलये करून महाराजास व्यथीत केले. महाराजास जहराचे झेंडू येऊन , एकाएकी घाबरे व्हावे , हातपाय टाकावे , बोलणे चालणे राहिले ! डोळे फिरवावे असे जाल्यामुळे वैद्य चिकित्सक बोलाविले . त्यास दाखविले. ते जवळ राहिले. अंतर्माळा शोषील्या . नाडी सुटल्या , जहरी विष कशात घातले ,केव्हा सेविले ? निद्रस्थानात उपद्रव जाला. बाईस विचारता त्याजला कर्तव्य , त्या सांगतात अशी गोष्ट कशी घडते ? तेंव्हा बाईंचे म्हणणे “ बाहेरून आले , पलंगावरी येऊन निजले , मी जवळ बसले. मला जीवात कसेसे वाटते , मला बोलवत नाही ,घाबरे होऊ लागले. माझे मनात ( आले ) जेवण जेवून आले ,यास विडा घेत्ल्यावारी लागतो हि सवई मागेपासोन आहे म्हणून गुळ चांगला आणून देऊ लागले, घेतला नाही . पाणी घेतले नाही . तेंव्हा फार हैराण होऊ लागले म्हणून तुम्हा सर्वास बोलावयास सांगितले. 
एकूणच या बखरीचा आशय हा कादंबरी स्वरुपात आहे.

◆ मराठ्यांची बखर ग्रांट डफ
  इंग्रज अधिकारी ग्रँट डफ हा उत्तरकालीन होता मात्र त्याने केलेली मराठी साधनांची जमवाजमव आणि केलेले लिखाण बऱ्याच अंशी सत्यतेच्या कसोटीवर खरे उतरले आहे

यानंतर शिवाजीचा अंतकाळ समीप आला. तो प्रकार असा “ शिवाजी रायगडी असता त्याला गुडघी म्हणून रोग झाला , तो प्रतीदिवशी वृद्धिंगत होत चालला . मग त्याच्या योगे करून मोठा ज्वर आला . ज्वर आल्यापासून सातव्या दिवशी तो मृत्यू पावला. 
ग्रँट डफ सुद्धा लिहतो की महाराजांचा मृत्यू हा आजारपणात झाला.

◆  शेडगावकर भोसले बखर अर्थात मराठी दप्तर रुमाल

सदर बखर ही १८५४ साली लिहल्या गेली, यामध्ये आणि सभासद बखरीत बरेचसे साम्य आढळते.

शके १६०२ रौद्र्नाम संवत्सरे फसली सं १०९० शिवराज्याभिषेक शके ७ या साली शिवाजी महाराज छत्रपती हे रायगडीच होते .तेथेच महाराज छत्रपती यांचे शरीरास व्यथा ज्वराची जाहली त्या समयी महाराज पुण्यश्लोकी व त्रिकाळज्ञानी सर्व जाणती यांनी आपला विचार पाहता तो औक्षमर्यादा जाहली असे जाणोन जवळील अष्टप्रधान व सरकारकून व कारकून व कारभारी व सरदार व हुजरे मंडळी यास बोलावून आणिले . बखरकाराने उपस्तीथ बावीस जणांच्या नावाची यादी दिली आहे. भागीथिंचे उदक आणोन स्नान केले. भस्म धारन करोन रुद्राक्षमाळा धारण केल्या आणि योगे अभ्यास करून आत्मा ब्रम्हंडास नेवून दश इंद्रिये यकाग्रयी करून शुभ्र चक्षु प्राण आक्रमण करोन प्रयाण केले. शेम मजकूर चैत्र शुद्ध १५ या रोजी सिवाजी महाराज छत्रपती कैलासवासी शांत जाहाले. 
यामध्ये आणि सभासद बखरीत साम्य असल्याने अधिक काय लिहणे ?

◆ ९१ कलमी बखर 
९१ कलमी बखर उत्तरकालीन आहे, ९१ कलमी बखरीमधील भारतवर्ष , राजवाडे ,साने , फॉरेस्ट या चार बखरींच्या प्रतीत 'नवज्वर' म्हणजेच नवीन प्रकारचा ज्वर असा उल्लेख येतो,
त्याचबरोबर राजाराम महाराजांच्या लग्नाच्या वेळी छत्रपती शिवरायांची तब्येत बरी नव्हती असाही उल्लेख वाकनविस यांनी या बखरीत केलाय. पण ९१ कलमी बखरीच्या जदुनाथ सरकार प्रत (तारिखे शिवाजी) ही भिन्न स्वरूपाची असून यात जदुनाथ सरकार सोयराबाई यांच्यावर विषप्रयोगाचा ठपका ठेवतात, मात्र जदुनाथ सरकार प्रत ही बरीच उत्तरकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी अनेक विवादास्पद लिखाण केले असल्याने या प्रतिला कितपत गांभीर्याने घ्यावे याचा विचार वाचकांनी अवश्य करावा.

◆ शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२८६ :- २३ ऑक्टोंबर १६८० डाक रजिस्ट्रारमधील डच्यांच्या पत्रातील नोंद “ गोवळकोंड्याहून असे लिहून आले आहे कि “ शिवाजीराजाला त्याच्या दुसऱ्या बायकोकडून विषप्रयोग झाला असावा ( ? ) . त्याचा कनिष्ठ पुत्र गादीवर बसावयाचे घाटत होते त्याला तुरुंगवास प्राप्त झाला आहे. आता शिवाजीचा जेष्ठ पुत्र राज्य करीत आहे. 
डाक रजिस्ट्रार मधील लिखाण हे ऐकीव माहितीवर आधारित आहे.

आता मोगली साधनांचा विचार करूयात, त्यामध्ये काय लिहलंय, 

◆ Storia Do mogor अर्थात असे होते मोगल. 
हा समकालीन ग्रंथ लिहला आहे इटालियन प्रवासी निकोलाय मनुची याने, तो १६५३-५४ च्या आसपास भारतात आला, मुघलांच्या दरबारात वैद्य म्हणून त्याने काम केलंय. तो आपल्या पुस्तकात लिहतो,
'तो ( शिवाजी ) सारखा मोहिमेवर चहूकडे फिरे या दगदगीने तो थकून गेला आणि रक्ताच्या उलट्या होऊन १६७९ मध्ये मरण पावला'

◆ मासिरे आलमगीरी
औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तेदखान “ मासिरे आलमगिरी “ यात लिहितो :- “ दख्खनमधून बातमी आली की शुक्रवार २४ रबि-उस-सानी १०९१ ला सिवा प्रवास करून परतल्यावर घोड्यावरून उतरला. उष्णतेमुळे त्याला दोनदा रक्ताची उलटी झाली. त्यामुळे तो मेला.

◆ तारीखे दिल्कुशा
मोगल इतिहासकार असलेला भीमसेन सक्सेना आपल्या तारिखे दिलकुशा यात लिहितो :- “ शिवाजी आजारी पडला काही दिवसांच्या आजारानंतर तो मरण पावला “

◆ मुन्तखब-उल्-लुबाब
खाफिखान हा देखील औरंगजेबाच्या समकालीन इतिहासकार होता त्याने मुन्तखब-उल्-लुबाब हा मुघलांच्या समग्र इतिहासावर आधारित कारकीर्द नमूद केली आहे, यात तो लिहतो :- “ शिवाजीने बालाघाटीतील समृद्ध व्यापारी पेठ जालना यावर स्वारी केली , याच वर्षी तो आजारी पडून मेला.”

वरील समकालीन मुघली इतिहासकार आपल्या साधनग्रंथांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी एका गोष्टीवर एकमत होताना दिसून येतात ते म्हणजे महाराजांचं निधन हे आजारी पडून झालं.

आता काही परकीय साधनांकडेही लक्ष देऊयात,


◆ पोर्तुगीज नोंद :- 
लिस्बनच्या नासिओनाल ग्रंथ संग्रहातील समकालीन पौर्तुगीज लेखात असे लिहिले गेले आहे कि “ शिवाजीस गळू ( Anthrax ) होऊन मरण आले. “ 
 
Anthrax हा आजार जनावरांच्या सहवासात असल्याने होतो, महाराजांची अख्खी कारकीर्द घोडदौडीत गेली, सततची दगदग आणि घोड्यांचा सहवास यामुळेही हा रोग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

◆ मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठवलेली बातमी
 
२८ एप्रिल ही तारीख असलेलं हे पत्र महाराजांच्या मृत्यूनंतर २५ दिवसांनंतरचं आहे ज्यामध्ये मुंबईकर इंग्रज लिहतात की शिवाजी राजा आता मरण पावला आहे, त्याला तेवीस दिवस उलटून गेलेले आहेत. Bloody flux (रक्तातिसार असं कारण ते देतात) हा आजार झाल्याने शिवाजीराजे १२ दिवस आजारी होते. सध्या सर्व शांत असून संभाजीराजा हा किल्ले पन्हाळा येथे आहे' असं इंग्रज पत्रातून नमूद करतात.

◆ ब्राम्हण मंत्र्यांनी विषप्रयोग केला याचं खंडन करूयात

ऐतिहासिक साहित्य फारसी खंड ६ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मोरोपंत पेशवे हे त्यावेळी फुलमरी परगण्यात मोहिमेवर होते त्याचबरोबर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे कराड भागात होते. इंग्रजी कागदपत्रांत असा उल्लेख आहे की अनाजी पंडित म्हणजेच अण्णाजी दत्तो हे त्यावेळी चौल भागात होते हे स्पष्टपणे दिसून येते.

◆ छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांकडून काही औषधं मागवल्याचा समकालीन इंग्रजी रेपोर्ट
या रिपोर्ट मध्ये असा उल्लेख आहे की शिवाजी राजांची काही माणसे ही इंग्रजांकडे औषधं घेण्यासाठी आली होती, त्यात त्यांनी cordissl stone म्हणजेच विषमज्वरावरील काही गुणकारी खडे औषधी यांबाबत माहिती मिळते.

◆ रोगाची कारणं :
इंग्रजी कागदपत्रांत bloody flux आणि anthrax अशी रोगांची नावं समोर येतात. सहसा जनावरांच्या सहवासात असणं, सततची घोडदौड आणि उष्णता यामुळे महाराजांना intestinal anthrax झाला असावा, ज्यामध्ये अन्न किंवा हवेद्वारे जीवजंतू शरीरात गेले तर pneumonia चाच हा एक प्रकार आहे. ज्यामध्ये रोगी हळूहळू क्षीण होऊन दगावतो. आपल्याकडे 

◆ निष्कर्ष
वरील सर्व समकालीन संदर्भ आणि पुरावे यांचा विचार करता, छत्रपती शिवाजी महाराज यांची अखेरची जालना येथील मोहिमेत झालेली दगदग, सततची घोडदौड आणि पट्टा अर्थात विश्रामगड या किल्ल्यावर त्यांनी घेतलेली विश्रांती आणि पुढे रायगडाकडे रवाना झाल्यानंतरही ते काही काळ आजारी असल्याचे समकालीन उल्लेख सापडतात. त्याचबरोबर स्वतः छत्रपती शिवराय हे इंग्रजांकडून औषधं मागवून घेतात यामध्ये आपल्याला समजून येतं की महाराज हे आजारी होते.
यावरून हेच सिद्ध होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला.

आता येऊ काही लोकांकडे ज्यांनी महाराजांचा मृत्यू हा विषप्रयोगाने झाला अश्या वावड्या उठवल्या.
वा. सी. बेंद्रे यांचा संदर्भ देऊन हे सांगतात की बेंद्रेंनी त्यांच्या शिवचरित्रात असा उल्लेख केलेला आहे की, महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झाला नाही.
पण हे लोकं ही गोष्ट विसरतात की बेंद्रे यांनी नैसर्गिकरित्या मृत्यू झाला नाही असा उल्लेख केला म्हणजेच, महाराजांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला नसून तो दुर्धर, असाध्य आजारपणामुळे झाला असं म्हणणं त्यांना अभिप्रेत आहे.

 देव, देश अन धर्माच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या महाराष्ट्रात पुरोगाम्यांनी जाती जातीत द्वेष निर्माण करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तर यांनी सेक्युलारीझम करून टाकलेलाच आहे पण आता महाराजांच्या मृत्यूचंही राजकारण करून नाहक दोन समाजात दुफळी माजवून हिंदू धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र चालू आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🌼🙏🚩

लेखन : रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड

संदर्भ : 

ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६
सभासद बखर
९१ कलमी बखर 
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ पत्र क्रमांक २२८६
मुन्तखब-उल्-लुबाब
तारीखे दिल्कुशा
मासिरे आलमगीरी
Storia Do mogor
मराठ्यांची बखर ग्रांट डफ
शेडगावकर भोसले बखर अर्थात मराठी दप्तर रुमाल
चिटणीस बखर
शिवदिग्विजय बखर

छायाचित्रे साभार : 
Maratha history youtube channel

9 टिप्पण्या