वाचावेच असे - गोनीदांचे समस्त दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांना पत्र
भटक्यांच्या विश्वात, प्रातःस्मरणीय म्हणून ज्यांचं नांव परम आदराने घ्यावं ते म्हणजे गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ आपल्या सर्वांचे गोनिदा... अर्थात समस्त भटक्यांचे लाडके आप्पा...
शालेय जीवनातच, अभ्यासक्रमातील धड्यांमधून त्यांची ओळख झालेली... तेव्हा गोनिदा म्हणजे कोकण आणि जिव्हाळ्याचा विषय. कोकणातील प्रवास वर्णने करावीत ती त्यांनीच त्यांचं पहिलं पुस्तक वाचलं ते पडघवली. नंतर कळलं की हा माणूस म्हणजे अचाट रसायन आहे त्याने ह्या सह्याद्रीवर इथल्या गडककिल्ल्यांवर अतोनात प्रेम केलंय अगदी झपाटल्यासारखं!
रायगड हा विषय म्हणजे ज्यांनी ध्यास म्हणून बाळगला आपल्या उर्वरित आयुष्याचा तंबू त्यांनी ह्या श्रीमद रायगडावर ठोकला. ह्या मातीशी त्यांची जी नाळ जुळली ते ऋणानुबंध शब्दांत गुंफणे कठीण.
डोंगर कसा पहावा?
पर्वत कसे जवळ करावेत?
गड कसा निरीक्षावा ?
दुर्ग कसा ओळखावा ?
निसर्ग कसा न्याहाळावा ?
अन् त्यांचं गुणगान कसं करावं ?
शब्द कसे वापरावेत?
शब्दांची जादू म्हणजे काय?
शिवराय अन् त्यांचं स्वराज्य म्हणजे काय?
रयतेचा राजा म्हणजे काय?
भक्ती, युक्ती अन् शक्ति म्हणजे काय?
अन् शेवटी दुर्ग-दुर्गेश्वर, सखा सांगाती सह्याद्री म्हणजे काय?
असं सारं सारं अमाप वैभव बालवयापासुनच आकळुन देणाऱ्या आप्पांनी... सह्याद्री आणि गडकोट कसे पहावेत ? याची एका आशक, मस्त फकिराची नजर तमाम भटक्यांना, दुर्गप्रेमींना बहाल केली तीही आप्पांनीच...
सा-या सा-यांना उद्देशून आमच्या आप्पांनी लिहिलेलं एक जबरदस्त अन् अजरामर पत्र सादर करतोय... खरं तर या पत्राचे मोठे कटआऊट्स प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी लावले पाहिजेत... हे पत्र वाचल्याशिवाय तर गडकिल्ल्यांवर प्रवेशही मिळू नये अशी सोयच करायला हवी...
समस्तांनी आणि अवघ्या अवघ्यांनी हे पत्र संपुर्ण वाचा आणि यावर विचार तर नक्कीच करा...
खरंतर हे पत्र एकसंध असं नाहीये, गोनीदांनी लिहलेल्या अनेक उत्कृष्ट पुस्तकांमधील उत्तमोत्तम वाक्य आणि त्यांच्या मनातील विचार त्यांनी दुर्गप्रेमींना आणि शिवभक्तांना बोलून दाखवले आहेत.
........
गडे हो !
अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या दुर्गदर्शनासाठी या. आपापले उद्योग एक्या अंगास सारून या. दो चौ दिसांची सवड काढून या. पण हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसतं डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं.
तिथं असतो भर्राट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला ! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यानं शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना.
त्या सगळ्या प्राचीन इतिहासाचं स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश !
आपल्या पूर्वजांनी दुर्ग ही तीर्थक्षेत्रे मानली होती. प्राणापलीकडे जपली होती. रामचंद्रपंत अमात्यांची आज्ञापत्र तर तुम्हास ठावकीच आहेत. त्यात म्हटलं आहे. 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजाभग्न होऊन उद्ध्वस्त होतो. देश उद्ध्वस्त झालीयावरी राज्य असे कोणास म्हणावे ? याकरीता पूर्वी जेजे राजे झाले, त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परीहार केले. हे राज्यतर तीर्थरूप थोरले कैलासस्वामींनी गडांवरूनच निर्माण केले.'
आज्ञापत्रात आणिक म्हटलं आहे.'गडकोट विरहीत जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. या करीता ज्यास राज्य पाहीजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजीना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजे आपले सुखनिद्रागार किंबहूना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे चित्तास आणून कोणाचे भरवशांवर न राहता त्याचे संरक्षण करणे.'
आसे हे सर्वात रक्षणीय जे गडकोट तीर्थ होय, त्याचा आज काय उपयोग असा नाठाळ प्रश्नं तुमच्या मनी उपजेल. त्याचं एकच उत्तर आहे, आज दुर्गांऐवजी मतदारसंघ बांधले जातात. त्यांची उपेक्षा करणार्या लोकप्रतिनिधींना कशाचेही संरक्षण करता येणार नाही हा अभ्रपटल न्याय आजही आहेच. म्हणून जे गडकोट तीर्थ एकेकाळी रक्षणीय होती, त्यांचा निदानपणी अनादर तरी करू नये.
आपल्या महाराष्ट्रात उणेपुरे लहानमोठे सुमारे पाचशे किल्ले. बखरीत उल्लेख आहे, 'हजरतीस तीनशे साठ किल्ले आहेती!' यापैकी उणेपुरे अडीचशे गड तरी मी पाहिले. अगदी स्वस्थपणे पाहीले. घाई-गडबड कसलीच नव्हती.
गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं.
धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, अापलाही. असं करू नयेरे बाळांनो !
इतिहास हा प्रकाशदीप आहे. उणंदुणं सर्व स्वच्छ दाखविणारा. काय त्यागलं पाहिजे, काय स्वीकारलं पाहिजे, हे आपलं आपणच ठरवायचं असतं.
ज्याचं स्मरण होताच मस्तक नम्र होते, बाहू स्फुरण पावतात, शरीरावर रोमावळी उभ्या ठाकतात, तो दिग्विजयी शिवाजी राजा यानं चार-दोन रात्री तरी या किल्ल्यांवर घालविल्या आहेत. तेव्हा -
'शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे,शिवरायाची सलगी देणे कैसे असे' .... ते या तटाबुरूजांनी अनुभवलं असणार !
या तटा बुरूजांना जर वाचा फुटली तर हे आपल्या कानी ते गुज कुजबुजतील. म्हणतील,'होय गडेहो, तो पवित्रात्मा आम्ही कोणे एके काळी आमच्या अंगाखांद्यावर वागविला आहे.'
कोण्या एका स्थानाचं ते अपूर्वत्व आम्ही ध्यानी घेत नाही. जिथं आमचे शूर पूर्वज निकरानं झुंजले, तिथं आम्ही चेंडू फळीचे डाव मांडतो !
ज्या पाषाण खंडावर बसून त्यांनी आपल्या घावाच आसूद निरपून काढलं, तिथं आम्ही विड्या विझवतो !
हे असं करता नये...
इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमीखंड असतो. इतिहासाचा दीप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते. इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे.
तो आपल्याला जाणवायला हवा. मग ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते. एरवी नुसती पायपिटी होते.
यावेगळं अगदी निसर्गसौंदर्याच्या दृष्टीनं जरी किल्ल्यांकडे पाहायचं म्हटलं तरी अशी ही रोमहर्षक, अशी ही चैतन्यमय, अशी ही वय विसरून टाकणारी, अशी ही तरूणाईस हाक घालणारी स्फूर्तीस्थळे अन्यत्र शोधून सापडायची नाहीत.
किल्ल्यांवरून दिसणारे सुर्योदय आणि सुर्यास्त हे तर अपूर्व दृश्य आहे. किल्ल्यांवरून रात्री घडणारे नक्षत्र दर्शन, हा अवर्णनीय आनंद आहे. त्याची कशाशीच तुलना करता यायची नाही. सांसारीक व्यापांपासून मन मुक्त होतं. रानावनातील पशुपक्ष्यांशी मैत्र जुळतं. स्वच्छ भराटवारा छातीत भरून घेतल्यानं आरोग्य आपला पत्ता विचारीत येतं. वाढतं वय तिथंच थांबतं. ते माघार वळतं. पाच-दहा वर्षांनी तरी तरूण झालो आहोत, असा साक्षात्कार होतो.
नाना समस्यांनी खच्चून भरलेल्या, काळंजून गेलेल्या जिवनातून काही क्षणं तरी बाजूस काढून जे या ऐतिहासिक स्फूर्ती स्थळांच्या दर्शनासाठी जातात त्यांना हा अनुभव आल्याशिवाय रहात नाही. साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे तरी यावेगळ काय असतं !
इति ! गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर.
संदर्भ : दुर्गभ्रमणगाथा
#सह्याद्री #गोनिदा #गिर्यारोहण
2 टिप्पण्या
Appancha photo talegaon railway stn var lavne jaruri aahe jyamule lokana tyanche kary kalel.varshache 3000 rupaye relwe ghete.
उत्तर द्याहटवाहो बरोबर आहे. धन्यवाद
हटवा