छत्रपती संभाजीराजेंचा खरा इतिहास जगासमोर आणणारे इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे
शिवकालीन इतिहासामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे वा. सी. बेंद्रे म्हणजेेेच वासुदेव सीताराम बेंद्रे हे होय.
मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचा आजचा जो निष्कलंक इतिहास आपणासमोर आहे तो फक्त आणि फक्त बेंद्रे यांच्या मुळेच.
बेंद्रे यांनी आपल्या आयुष्यातील जवळजवळ 40 वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास संशोधनात खर्च केली.
त्यांनी याची सुरुवात 1918 मध्येच केली होती. विविध कागदपत्र, पुरावे जमा करून त्यावर विश्लेषणात्मक विचार करून अंतिमतः निष्कर्ष काढणे अशी त्यांची पद्धत होती.
स्वराज्याचा दुसरा छत्रपती होण्याचं भाग्य लाभलेला आपला शंभू राजा विषयी होत असलेली बदनामी त्यांना खटकली, शिवभास्कराचा पुत्र हा तेजस्वीच असला पाहिजे हे त्यांना माहीत होतं पण प्रश्न होता तो पुराव्यांचा, कागदपत्रांचा. कारण इतिहास काय आहे हे आपल्याला काय वाटतं हे बघून ठरत नसतो तर तो समकालीन कागदपत्रे, बखरी, संदर्भ यांच्या आधारे निष्पन्न होतो. तो जर तर वरही चालत नाही.
यासाठी त्यांनी कागदपत्रांचा धांडोळा घेतला प्रसंगी परदेशी जाऊन तेथील डच, फ्रेंच येथील कागदपत्रांचा अभ्यास केला.
परत येताना त्यांनी जवळपास 25 खंड होतील एवढा
प्रचंड कागदपत्रांचा जामानिमा सोबत आणून अनेक इतिहास अभ्यासकारांवर त्यांनी उपकार केले आहेत.
छत्रपती संभाजी राजेंच चरित्र 1960 साली पूर्ण होऊन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं.
त्यांनी फक्त छत्रपती संभाजी महाराजच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, मालोजीराजे, छत्रपती राजाराम महाराज यांच्यावरही चरित्र लिहलं आहे.
वा. सी. बेंद्रे यांची इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी :
◆ छत्रपती शिवाजी महाराजांचं आजचं जे मूळ चित्र आपण जे बघतोय ते बेंद्रे यांनीच परदेशातून शोधून आणले. त्याआधी इतिहासातील सर्वच पुस्तकांमध्ये छत्रपती शिवरायांचं चित्र हे इब्राहिम खान नावाच्या व्यक्तीचं होतं जे सर्रासपणे महाराजांचं चित्र म्हणून वापरात होतं ते चित्र मनुची याने काढून घेतलं होतं.
पण बेंद्रे हे परदेशात इतिहास संशोधन करत असताना त्यांचा हाती फ्रान्सिस व्हॅलेंटीन नावाचा डच गव्हर्नर जो होता त्याने छत्रपती शिवराय सुरत मोहिमेत 1663-64 मध्ये असतांना त्याच्या चित्रकाराकडून महाराजांचं चित्र काढून घेतलं होतं. आणि हे महाराजांचं एकमेव असं चित्र आहे जे समोरासमोर असताना चित्रकाराने काढलेलं आहे. हे चित्र व्हॅलेंटीन याच्या संग्रहातून बेंद्रे यांना मिळालं. ह्या चित्राची पूर्ण शहानिशा करून ते अस्सलच आहे याची खात्री करून याच चित्राची एक नक्कल तयार करवून घेतली आणि आज आपण जे चित्र बघतोय ती त्यांचीच देण
◆ आज आपण 19 फेब्रुवारी ही महाराजांची जयंती साजरी करतो. ती तारीख शोधण्याचे श्रेयसुद्धा बेंद्रे यांनाच जाते.
◆ छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी वृंदावनही बेंद्रे यांनीच शोधून काढले. हा शोध हे सिद्ध करतो की बेंद्रे हे फक्त इतिहासकारच नव्हते तर छत्रपती संभाजी महाराज हा त्यांचासाठी ध्यासाचा विषय होता.
◆ इंग्लंड मधील आज आपण जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा फोटो बघतो तो सुद्धा बेंद्रे यांनीच मिळवला होता, आणि ती तलवार भवानी तलवार नसूूून ती जगदंबा तलवार आहे हे बेंद्रे सिद्ध करतात.
◆ भारतीय इतिहास संशोधन मंडळामध्ये पेशवे दप्तरातील जवळपास 4 कोटी कागदपत्रे विस्कळीत रित्या संग्रही होती. त्या कागदपत्रांची योग्य प्रमाणात वर्गीकरण आणि कॅटलॉग बेंद्रे यांनीच तयार करून त्यांची योग्य विभागवार रचना केली. हे मोठं किचकट काम त्यांनी पूर्ण करून त्यांनी इतिहास संशोधन आणि अभ्यास हे सोपं करून टाकलं.
त्यांची ही कामगिरी समजल्यावर तत्कालीन मद्रास प्रशासनाने त्यांना तंजावर येथील कागदपत्रे यांची योग्य विभागवार मांडणी करून त्याचा कॅटलॉग तयार करण्याचे काम बेंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आलं आणि विषयाचा आवाका बघता 5 वर्षाची मुदत त्यांनी बेंद्रेना दिली. पण बेंद्रे यांनी ते काम फक्त 2 वर्षातच पूर्ण करून आपल्या कामाची चुणूक दाखवली
◆ त्यांचा सगळ्यात मोठा पुरावा छत्रपती शंभूराजे यांच्याविषयी हा आहे की जर छत्रपती शंभूराजे बदफैली, व्यसनी असते तर शेवटच्या दिवसामध्ये त्यांनी हार मानली असती, पण ज्या धीरोदात्तपणे ते त्या प्रसंगाला सिंहासारखे सामोरे जातात त्याला इतिहासात तोड नाही. बस्स हाच मोठा पुरावा त्यांच्यावरील सगळ्या आरोपांचे खंडन करतो.
◆ अजून एक असा आरोप होता की छत्रपती संभाजी राजे यांनी सोयराबाई यांना भिंतीत चिणून मारले आणि राजाराम महाराज यांना नजरकैदेत ठेवलं.
ह्या आरोपाचे खंडन करताना बेंद्रे पुराव्यानिशी सिद्ध करतात की त्यांनी महाराजांच्या माघारी राजाराम महाराज यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं आणि सोयराबाई ह्यांच त्यानंतर सव्वा वर्षांनी निधन झालं.
◆ सईबाई राणी साहेब यांचा मृत्यू हा शंभूराजे यांच्या जन्मानंतर 2 वर्षांनी प्रतापगड या किल्ल्यावरच झाला हे बेंद्रे सिद्ध करतात.
◆ छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना संगमेश्वरी ठेवण्यामागे हा हेतू होता की रायगडावर होणाऱ्या कट कारस्थानापासून त्यांना दूर ठेवावं.
वा. सी. बेंद्रे यांच्या आधी
जनसामान्यांमध्ये संभाजी महाराजांच्या चरित्राला जो डाग लागला होता, एका ज्वलज्वलनतेजस अश्या राजपुत्राला शापित राजहंसाच जीवन कंठावं लागलं. त्याच्या मृत्यूनंतरही काही शतके तो वेदना सहन करत राहिला.
कादंबऱ्या, नाटककार मंडळींनीही खोटया प्रसिद्धीसाठी आणि रंजकतेसाठी शंभुराजांना मृत्यूनंतरही यातना दिल्या. कादंबऱ्या, नाटकं, मालिका हा इतिहास नसून तो लेखकाचा, दिग्दर्शकाचा कल्पनाविलास असतो पण दुर्दैवाने काही वाचक आणि रसिक यालाच प्रमाण इतिहास मानून महापुरुषांची व एकप्रकारे इतिहासाचीच हेटाळणीच करतात.
पण वा. सी. बेंद्रे यांच्यासारख्या इतिहास भीष्माने छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थाने न्याय दिला.
पुढे चालून बेंद्रे यांचाच संदर्भ घेऊन अनेक जणांनी छत्रपती संभाजी महाराज अजरामर केले त्यामध्ये प्रा. कानेटकर यांची काही नाटकं असतील किंवा सौ. कमलताई गोखले यांनी छत्रपती शंभूराजे यांच्या चरित्रवरील phd साठीचा त्यांचा ग्रंथ असेल, कादंबरीकार सावंत यांची छावा कादंबरी असो किंवा अलीकडेच प्रसिद्ध असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचं ज्वलज्वलनतेजस संभाजी महाराज हेे डॉ. सदाशिवराव शिवदे याचं पुस्तक असो. पण या सर्व
लोकांमध्ये हे चरित्र सादर करण्याची उर्मी कुठून आली. या सर्व घटनेचा पाया हा बेंद्रे यांनी घालून दिला.
अशा इतिहासाच्या भीष्माचाऱ्यांना आपला मानाचा मुजरा !
0 टिप्पण्या