३२ शिराळा : देशातील प्रसिद्ध अन अनोखी नागपंचमी
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आपल्या भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात सणउत्सव आपल्या आयुष्यात चैतन्याची आणि उत्साहाची उधळण करायला येतात. त्या प्रत्येक सणामागे काही न काहीतरी महत्व असतं, शास्त्र असतं.
असाच एक सण म्हणजे नागपंचमी.
श्रावणातल्या सरींनी मन चिंब होऊन जायला होतं. वातावरणात एक सुखद बदल जाणवायला लागतो. श्रावण पावसासोबत घेऊन येतो विविध सणांची पर्वणी.
असाच श्रावणातील पहिला आणि महत्वाचा असा एक सण म्हणजे नागपंचमी.
नाग किंवा साप हा शेतकऱ्यांचा मित्र. शेतातील सूक्ष्म जीव जंतू जे की पिकाची नासाडी करतात त्यांना नष्ट करून हे सर्प एकप्रकारे शेतकऱ्याची मदतच करत असतात किंबहुना ते शेतीच्या चक्राची अव्याहतपणे चालू ठेवतात.
तर नागपंचमी म्हणजेच नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपण सर्वजण या दिवशी नागाच्या वारुळाची पूजा करत असतो. पण तुम्ही म्हणाल मग यात नाविन्य ते काय ?
तर आपण आज एका अशा नागपंचमीविषयी जाणून घेणार आहोत जी की महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा येथील नागपंचमी. खुद्द discovery चॅनेलने येथील नागपंचमीची डॉक्युमेंटरी तयार केली होती.
तर येथील नागपंचमीचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे घरोघरी केली जाणारी जिवंत नागांची पूजा.
बेंदराच्या सणाला ग्रामदैवत अंबामाता मंदिरात देवीला विधिपूर्वक नारळ अर्पण करून शिवारात नाग पकडण्यासाठी गावकरी जातात. हे नाग मुख्यत्त्वेकरून शेताच्या बांधावर सापडतात. तर हे नाग शोधायचे कसे ?
यासाठी शिराळकर एक खास तंत्र वापरतात ते म्हणजे, नागाचे ओल्या अंगाचे ठसे जिथे कुठे दिसतात त्याच्या आसपास एक बीळ असते त्यात नाग सापडतो त्या ठशांना स्थानिक शिराळकर माग म्हणून ओळखतात. त्या नागाला पकडल्यानंतर एका मडक्यात त्याला ठेवून वरून एक कापड दोरीने बांधून ठेवतात. नागपंचमीला घरोघरी नागांची पूजा केल्या जायची. सुवासिनी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात. व पूजन केल्यानंतर गावकरी नागांना जिथून पकडलं होतं तिथं परत नेऊन सोडतात. गेल्या काही दशकांत हे गाव प्रसिद्धीच्या इतकं झोतात आलं की discovery चॅनेलनेही यांची दखल घेऊन एक documentry बनवली.
ही प्रथा केव्हा सुरू झाली ?
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही प्रथा गोरक्षनाथ महाराजांनी सुरू केली. ती अशी की, गोरक्षनाथ महाराज या गावी भिक्षा मागण्यासाठी आलेले असताना ते एका वृद्ध स्त्रीच्या वाड्याजवळ आले, पण त्या स्त्रीने भिक्षा देण्यास जरा विलंब केला तेव्हा गोरक्षनाथांनी त्या म्हातारीला विचारलं की एवढा विलंब का झाला ? तेव्हा स्त्रीला उत्तर दिले की आज नागपंचमी आहे आणि मी नागपूजन करत होते. तेव्हा महाराज म्हणाले की जिवंत नागाची पूजा करशील का ? तेव्हा गोरक्षनाथांनी जिवंत नाग प्रकट केला. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असा इतिहास लिखित स्वरूपातही जतन केलाय.
पण २०११ साली वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत जिवंत नागाला पकडून त्यांची पूजा करणं कायद्याने गुन्हा ठरला. व हजारो वर्षांची परंपरा स्थगित झाल्याने गावकरी नाराज आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की ते स्वतःच्या लेकरांइतकं नागांना जपतात सापांना ते कधीही इजा करत नाहीत उलट पूजन झाल्यावर त्यांना त्यांच्या बिळात सोडून देण्यात येतं. नागाला किंवा सापाला पाणी कसं पाजयचं हे सर्पमित्रांना ह्या शतकात माहिती झालंय हे आमच्या पूर्वजांना शतकानुशतके माहीत होतं व तेच आम्हीही अवगत केलंय.
यासाठी गावकर्यांनी वेळोवेळी याविरुद्ध आक्षेप घेतला पण सरकारी नियमांपुढं ते हतबल ठरले.
पुन्हा कधी एकदा नागांचं घरोघरी पूजन होऊन दणक्यात नागपंचमी साजरी होईल याची तळमळीने वाट बघतोय प्रत्येक शिराळकर ..!
लेखन : रोहित पेरे पाटील
©इतिहासवेड™
0 टिप्पण्या