दिवाळीला किल्ले का बनवतात ?
दिवाळी हा सण भारतात फार पूर्वीपासून साजरा केला जातो
लक्ष दिव्यांनी उजळणाऱ्या ह्या सणाची प्रत्येकाला उत्सुकता ही असतेच.
त्यामुळे आता हा प्रश्न पडतो की लहान मुले दिवाळीला किल्ले का बनवतात ?
महाराष्ट्र प्रदेशात दिवाळीच काय तर कुठलाही सण हा फक्त प्रथा म्हणून सुरू होता आनंद ओसंडून वाहत गेलाच नाही कधी, दुष्काळामुळे ना कधी सामान्यांची भूक शमली, ना घरच्या कारभारणीला नवंकोरं लुगडं ल्यायला मिळालं.
दुष्काळ, रोगराई हे तर पाचवीलाच पुजलेले पण वरून परकीय जुलमी सत्ताधीशांचा त्रास, छळ तो वेगळाच.
एकाच वेळी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी तोंड देत सामान्यांची ससेहोलपट होत होती.
ह्या महाराष्ट्रातील क्षात्रतेज तर केव्हाच लुप्त झालं होतं, स्वतःस क्षत्रिय समजणारे अनेक जण मुघली बादशहासमोर मुजरा करत होते, वतनदारांनी तर माणुसकी केव्हाच सोडली होती.
रयत ह्या संकटात होरपळून निघत असताना. 1630 साल त्यांच्या अंधारलेल्या जीवनात सुवर्णमय प्रकाश घेऊन आलं, सुलतानी संकटाला आव्हान देत गर्जना करत उजाडलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर पुत्रवत प्रेम केलं, ज्याचे गडकिल्ले त्याचे राज्य हे महाराजांनी जाणलं होतं, म्हणून त्यांनी अनेक किल्ले जिंकले.
किल्ले हे प्रतीक असतात संकटाशी कसं भिडायच याचे, ते संरक्षक असतात प्रदेशाचे, प्रजेचे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीत उभं कसं राहायचं याचे.
या गडकिल्ल्यांमुळेच महाराष्ट्राचीच नव्हे तर पुढे अखंड हिंदुस्थानची प्रजा निर्भयपणे, आनंदाने जगू लागली, शिवकाळात प्रजेला स्वातंत्र्य मिळाले होते तो एक सुवर्णकाळ होता !
दिवाळीला खरं महत्व प्राप्त झालं ते शिवकाळात.
महाराज व किल्ल्यांप्रती एक आदरभाव म्हणून घराबाहेर दिवाळी सणाला किल्ले बनवतात. दिवाळी हा सण दिव्यांचा, लक्ष्मीचा. गडकिल्ल्यांमुळेच व त्या अर्थी छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच रयतेचे घर प्रकाशित झाले व समृद्ध झाले. व किल्ले हे संरक्षकतेचं प्रतीक आहे म्हणून दिवाळीला घराबाहेर किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली.
आजच्या आधुनिक युगात दिवाळीला किल्ले बनवणं हे दुर्मिळ होत चाललंय.
तुमच्या घरातील लहान मुलांना जरूर आपला वारसा आणि इतिहास संगोपन करायला शिकवा.
हा वारसा तुमच्या पुढच्या पिढीला द्या !
2 टिप्पण्या
👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद🙏
हटवा