इतिहासातील एक दुर्लक्षित पान तंजावरचं गौरवशाली मराठी राज्य !
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आज आपण जाणून घेणार आहोत, बऱ्याच जणांना अज्ञात असलेलं तंजावरचं गौरवशाली मराठा राज्य.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू म्हणजेच व्यंकोजीराजे बऱ्याच जणांना माहिती असतीलच. हे व्यंकोजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजे आणि तुकाबाई (मोहिते कुळातील) यांचे पुत्र.
१६७४ मध्ये आदिलशाहाच्या आदेशाने व्यंकोजीराजे यांनी तंजावरच्या नायक राजाचा पराभव केला आणि पुढे आदिलशाहीच्या अस्तानंतर स्वतःला तंजावर चा राजा म्हणून घोषित केले.
व्यंकोजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संवादाची अनेक पत्रं आज उपलब्ध आहेत. काही पत्रे कौटुंबिक आहेत तर काही राजकीय.
छत्रपती शिवराय आणि व्यंकोजीराजेंमधील काही विवादास्पद घटनाही आपल्याला माहिती असतीलच.
दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी व्यंकोजीराजे यांना भेटीस बोलावल्यावर व्यंकोजीराजे यांनी भीतीने आपल्या छावणीतून मध्यरात्री पलायन केले होते. पुढे महाराजांनी व्यंकोजीराजे यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी व्यंकोजींनी वैराग्य धारण केले होते. त्यावेळी छत्रपती शिवरायांनी त्यांना लिहलेले पत्र आजही सर्वांना प्रेरणादायी आहे.
त्याची लिंक : http://itihasved.blogspot.com/2020/12/blog-post_11.html
तंजावरचा गौरवशाली इतिहास.
तंजावर हे फार पूर्वीपासून चोल राजे १२४४ पर्यंत राज्य करत होते. पुढे पांड्य राजांनी इ.स. १५५९ पर्यंत आणि त्यांच्या नंतर नायक नायक राजांनी १६७३ पर्यंत राज्य चालवले नंतर व्यंकोजींनी तंजावरला स्वतंत्र मराठा राज्य स्थापन केले.
या तंजावरच्या राजघराण्यात अनेक कर्तबगार राजे होऊन गेले ज्यांनी जवळपास १८० वर्ष राज्यकारभार केला. या राजघराण्याचा इतिहास खूपच देदीप्यमान असून तो मोजक्याच स्वरूपात मांडणे योग्य ठरणार नाही त्यामुळे आज आपण फक्त सरफोजीराजे दुसरे यांची कारकीर्द जाणून घेणार आहोत.
सरफोजीराजे भोसले २रे
सरस्वती महालच्या नियतकालिकात असलेल्या एका परिच्छेदात सरफोजीराजेंच्या सामर्थ्याची कल्पना करता येते,
" अलीकडच्या काळातील गादीवर बसलेला कोणीही राजा, दुसऱ्या सरफोजी इतका चतुरस्त्र बुद्धिमत्तेचा झालेला नाही. विविध क्षेत्रांत त्यांची बुद्धी चालत असे. नृत्य, संगीत आणि चित्र यांसारख्या ललितकला, नाट्य, गद्य, आणि काव्य यांसारखे साहित्य आणि शिवाय, वैद्यक, प्राणिशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या सर्व विषयांना त्यांच्या बुद्धीत जागा होती. इतर राजेलोकांप्रमाणे त्यांनी साहित्यिकांना अगर कला वा शास्त्रकारांना केवळ अनुदानेच दिली नाहीत तर त्यांनी स्वतः या विविध क्षेत्रांत मोलाची भर घातली. सरस्वती महाल हे सरफोजीराजे यांच्या ऐश्वर्याचे चिरस्थायी स्मारक असून त्यावरून या थोर राजाच्या प्रतिभेचे विविध पैलू दिसून येतात "
सरफोजीराजे यांच्यासारखा राजा त्यांच्यानंतर कुणीही झाला नाही.
त्यांनी आपला वेळ ग्रंथसंग्रह, विद्याप्रसार, काव्य आणि नाटक निर्मिती त्याचबरोबर कला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, संस्कृती, आयुर्वेद अशा अनेक कलांना राजाश्रय दिला.
त्यांच्या काळात तंजावर हे देशातील विद्येचे माहेरघर होते.
इतकेच नाही तर जेव्हा फ्रान्समध्ये शस्त्रक्रियेचे संशोधन चालू असताना महाराजांनी इकडे रुग्णांचे मोतीबिंदू चे ऑपरेशन केले होते.
आधुनिक विचारांचा हा राजा अस्खलितपणे इंग्रजी बोलायचे.
विद्याव्यासंग असलेले सरफोजी राजेंनी सरस्वती महल या ग्रंथालयाची उभारणी केली ज्यामध्ये त्यांनी सबंध भारतातील सहस्रावधी हस्तलिखितांची भर घातली आणि त्यांचे जतन केले.
त्यांचं अफाट वाचनवेड पाहून इंग्लंडच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने आपले सन्माननीय सभासद करून घेतले होते. यामुळे महाराजांनी जगभरातील उत्तमोत्तम पुस्तके आपल्या सरस्वती महल या ग्रंथालयात भर घातली. त्यांनी पुस्तके फक्त संग्रहिच नाही ठेवली तर त्यांचे वाचन करून समाजासाठी त्याचा उपयोग केला.
त्याचबरोबर त्यांनी बृहदेश्वराच्या मंदिरात असलेल्या एका विस्तीर्ण भिंतीवर आपल्या घराण्याचा सबंध इतिहास ( मालोजीराजेंपासूनचा ) शिलालेख कोरवून घेतला. भरतनाट्यमला त्यांच्या काळातच मोठे महत्व प्राप्त झाले.
◆ देशातील पहिला छापखाना त्यांनी उभारला.
◆ देशातील मुलींसाठीची पहिली शाळा सरफोजीराजेंनी तंजावरला सुरू केली
◆ नेत्र विशारद असलेले सरफोजीराजेंनी केलेली मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्याकाळी चमत्कार म्हणून मानल्या गेली होती
◆ तत्कालीन भारतातील मोठे हॉस्पिटल (धन्वंतरी महल) सरफोजीराजेंनी उभारले होते. ज्यामध्ये आयुर्वेद, अलोपॅथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करत.
◆ तंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी राजेंना जातो.
◆ ज्या काळात एक्सरे आणि फोटोग्राफी चा शोध लागला नव्हता तेव्हा वैद्यकीय उपचारापूर्वी आणि नंतर रुग्णामध्ये काय बदल झाला याचे ते चित्र काढून घेत.
◆ त्यांनी फक्त रुग्णांवर उपचारच नाही केले तर उपचार पद्धतींचे योग्य डॉक्युमेंटेशन करून शरभेंद्र वैद्य मुरइगल हा ग्रंथ लिहून वैद्यकीय उपचार आणि अनुभव यांचे कथन केले आहे.
◆ त्यांच्या काळात त्यांनी तंजावरला भूमीगत सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली.
◆ आपली मराठी संस्कृती, महाराष्ट्राचं संगीत त्यांनी तंजावरच्या मातीत रुजवलं.
◆ सरफोजीराजांचा काळ हा संगीताचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यांच्या दरबारात ३६० संगीत तज्ञ होते.
◆ त्या काळात महाराजांनी उत्तमोत्तम चित्रकार परदेशी पाठवून तेथील शहरांची चित्रे काढून घेतली होती.
◆ जीर्ण अवस्थेत गेलेल्या अनेक हस्तलिखितं जी ताडपत्र, पामच्या पत्रांवर लिहलेली होती, ती जतन करून ऐतिहासिक ठेवा त्यांनी जतन केला हे खूप महत्वाचे काम त्यांनी केले ज्यामुळे अनेक अज्ञात इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचला.
त्यातील एक म्हणजे कवी परमानंद कृत शिवभारत.
◆ तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडुन वाचल्या तर “रामायण”, डावीकडून वाचल्या तर “महाभारत” आणि वरुन खाली वाचल्या तर “श्रीमदभागवत” आहे.
◆ सरफोजी राजेंचे पुत्र शिवाजीराजे हे उदार आणि दाता असल्याने त्यांना दक्षिणेतील कर्ण म्हणत असत.
◆ तंजावर घराण्याने १९६२ च्या चीन युद्धात भारत सरकारला २००० किलो सोने मदत म्हणून दिले होते.
त्याचबरोबर १९७१ च्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला शस्त्रास्त्रांची मदत केली होती.
◆ त्याचबरोबर विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत या घराण्याने १०० एकर जमीन दान दिली होती.
अशा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात गौरवशाली इतिहास लाभलेले तंजावरचे भोसले घराणे आणि सरफोजीराजे यांना आपल्या सर्वांतर्फे मानाचा मुजरा !
सातारा, कोल्हापूर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक मोठ्या आदराने समाजात वावरतात.
यापुढेही असाच अज्ञात इतिहास मी आपणांसमोर मांडत राहणार आहे.
धन्यवाद !
लेखन : रोहित पेरे पाटील.
4 टिप्पण्या
अतिशय उत्तम माहिती
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद दादा
हटवातंजावर च्या भोसले घराण्यातील एक भोसले पुण्यात रहातात ph 09822090635
उत्तर द्याहटवाहो का नवीनच माहिती मिळाली. धन्यवाद
हटवा