नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

आज आपण गडकिल्ल्यांवर असणाऱ्या विविध शिल्पांचा अर्थ, त्याचं प्रयोजन आणि इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊ.

खरंतर गडभ्रमंती करताना आपल्या सगळ्यांना गडांच्या दरवाजावर विविध प्रकारची शिल्पं बघायला मिळतात त्यामध्ये कमळ पुष्प, शरभ, गंडभेरुड, व्याल, मारुती, गणपती असे वेगवेगळे शिल्प आपल्याला गडांच्या प्रवेशद्वार तसेच काही ठिकाणी बुरुजांच्या तटावर बघायला मिळतात.

प्रामुख्याने हे शिल्प कोरण्याचे कारण म्हणजे ही शिल्पं प्रतिकं असतात आणि दुसरं कारण म्हणजे द्वार सजावटीचे कारण असेल.


कमळ

कमळ पुष्प हे अधिकाधिक आढळणारे शिल्प असून ते गडकिल्ल्यांचे प्रवेशद्वार, गढी, मंदिरे, आणि वाड्यांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आढळून येतात.
कमळ हे सरस्वती देवीचे, शुद्धतेचे आणि पावित्र्याचे प्रतिक आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांवर सुशोभणाच्या दृष्टीने कमळ पुष्प कोरण्यात येते त्याचबरोबर शरभ, हत्ती आणि कमळ हे सामर्थ्य, लक्ष्मी आणि सरस्वती यांचं प्रतिक असल्याने ते द्वारशिल्प म्हणून गडाची शोभा वाढवतात.
महादरवाज्याच्या दोन्ही बाजूस असणारी कमळ आणि शरभ शिल्प

शरभ

हिंदू पुराणात शरभाचा उल्लेख आढळतो, शरभ हा प्राणी पुराणानुसार शरभ हा शिवशंकराचं एक रूप असून सामर्थ्य आणि विजयाचं प्रतिक आहे. शरभ हा एवढा सामर्थ्यशाली असतो की तो हत्ती आणि सिंहाला देखील मारू शकतो.
शरभ हा प्राणी काल्पनिक आहे पण तो शिल्पांद्वारे अजरामर झालाय. रायगड, राजगड, अंतुर, वेताळवाडी, सुधागड, जंजिरा सहित अनेक गडकिल्ल्यांवर शरभ शिल्प आढळून येतं.
शरभाचे अनेक प्रकार असतात ज्यामध्ये जेता शरभ हा पायाखाली हत्ती चिरडताना दिसून येतो. द्विजेता शरभ हा पायाखाली दोन हत्ती चिरडताना दिसून येतो. असेच काही ठिकाणी शरभाने पायाखाली पाच सहा हत्ती चिरडताना दिसून येतात. 
सुधागडावरील शरभाने चार हत्ती पायाखाली चिरडले आहेत. याचा अर्थ क्षात्रतेजाने जागृत झालेल्या सिंहाने (महाराजांनी) चार मदमस्त हत्ती (पातशाह्या) पायाखाली चिरडले आहेत.
जंजिरा किल्ल्यावरील शरभाने चार हत्ती पायाखाली, एक तोंडात आणि एक शेपटीत धरलेला आहे, याचा अर्थ त्या राज्याने ६ सत्तांशी सामना करून गड अजिंक्य ठेवला.

शरभ शिल्पाचा दुसरा एक अर्थ म्हणजे शरभ हे बळाचे ताकदीचे, सामर्थ्याचे प्रतिक आहे आणि हत्ती हे लक्ष्मी आणि ऐश्वर्याचे चिन्ह आहे (गजांतलक्ष्मी) म्हणजे त्या राजाचं साम्राज्य हे बलशाली आणि सामर्थ्यवान असून ऐश्वर्य त्याच्या पायाशी लोळण घेत आहे असादेखील त्याचा अर्थ होतो.


गंडभेरुड ( गरूडभेद )

ज्याप्रमाणे शरभ हे शंकराचं प्रतिक आहे त्याच प्रमाणे गंडभेरुड म्हणजेच गरूडभेद हे विष्णूचे रूप मानण्यात येते.
गंडभेरुड हे शिल्प शरभाच्या मानाने तुरळक गडकिल्ल्यांवर आढळते. गंडभेरुडास गरुडाची दोन तोंडे परस्परविरुद्ध असून त्यांचं धड एकच आहे.
पुराणानुसार गंडभेरुड हे विष्णूचे प्रतिक असल्याने ते गडकिल्ल्यांपेक्षा जास्त मंदिरांच्या दरवाज्यावर आढळते.

तर अशी ही शिल्प संस्कृती याचे महत्व खरंतर खूप आहे पण मी थोडक्यात येथे मांडण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राला दगडांच्या देशा म्हणून संबोधलं गेलंय, आणि ते खोटं थोडंच आहे, इथल्या लेण्या, हेमाडपंथी मंदिरं, पुरातन गुहा गडकिल्ल्यांवरची ही शिल्प; काय वर्णन करावं यांचं सहस्त्र स्तुतीसुमने उधळून टाकावीशी वाटतात यांच्यावर एवढं घडवलंय इथल्या कारागिरांनी दगडांना ! खरंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक दगडाला इतिहास आहे, इथली प्रत्येक चिरा त्या सुवर्णकाळाची साक्षीदार आहे.

जिथं इतिहास मूक होतो तिथं भूगोल बोलतो असं म्हणतात, ही शिल्पं देखील त्याच भूगोलाच्या पाषाणाची आहेत, जी निर्जीव असून देखील वर्षानुवर्षे आपल्याला आपला पराक्रमी इतिहास दाखवत आहे, फक्त गरज आहे त्यांना अभ्यासकाच्या दृष्टीने बघण्याची.

लेखन : रोहित पेरे पाटील
  © इतिहास वेड

1 टिप्पण्या