नमस्कार मित्रांनो जय शिवराय,

आज आपण इतिहास आणि वर्तमान या दोन्ही ठिकाणचा प्रवास करून गतवैभवाचा पराक्रमी इतिहास ते आजची शोकांतिका असा हृदयद्रावक प्रवास करणार आहोत,
 सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं नाव न ऐकलेला शिवभक्त निराळाच.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निरखून पारखून घेतलेल्या काही मोजक्या हिऱ्यांपैकी प्रतापराव गुजर हेही एक. प्रतापरावांचं नाव म्हणजे कुडतोजी गुजर पण त्यांनी केलेला पराक्रम आणि गाजवलेलं शौर्य बघून महाराजांनी त्यांना त्यांच्या पराक्रमाला साजेसं असं नाव दिलं 'प्रतापराव'
नेतोजी पालकर यांच्यानंतर सरसेनापती पदाची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन महाराजांचा हर एक शब्द त्यांनी शिरसावंद्य मानला.
आत्ताच ४-५ दिवसांपूर्वीचा दिनविशेष बघितला तर बहलोलखानाला नामोहराम करणारे सळो की पळो करून सोडणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आठवतात. अनेक जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस आणि पोस्टद्वारे त्यांना वंदन केलं (वेडात मराठे वीर दौडले सात).
अशा शूरवीर सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा भोसरे गाव ता. खटाव जिल्हा सातारा येथील ४०० वर्ष जुन्या वाड्याची तटबंदीचा भाग आणि बुरुज नुकताच पाडण्यात आला. हो बरोबर वाचलंत तुम्ही. ४०० वर्षांपासूनची बेदरकार निडर झुंजीच्या इतिहासाला ४ मिनिटांत पोकलेनच्या साहाय्याने पाडण्यात आले.
ही आपली इतिहासाबद्दलची जाणीव आणि आस्था.
खरंतर या महाराष्ट्राच्या प्रत्येक दगड चिऱ्यांना इतिहास आहे, इथल्या प्रत्येक तटाबुरुजांनी अनुभवलाय तो देदीप्यमान इतिहास, इथल्या प्रत्येक दगडी जोत्यांवर बागडले अनेक पुण्य पावलं, इथल्या प्रत्येक भिंतींनी ऐकलीये गारद आणि गुप्त खलबतं सुद्धा. तोच इतिहासाचा मूक साक्षीदार आज नामशेष करण्यात आला.
सविस्तरपणे घटना सांगतो नक्की झालं काय, तर एक
अत्यंत निषेधार्ह कृत्य आज घडले😠 सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भोसरे गाव जि. सातारा येथील ऐतिहासिक वाड्याचे बुरुज आणि तटबंदी स्थानिकांनी पाडली, एक न भरून येण्याजोगे नुकसान होऊन तिथे इतिहासाला गालबोट लागले आहे, सदरील प्रकार हा स्थानिक गुजर यांनी केला आहे, या घटनेचा प्रतापराव गुजर यांचे वंशज सत्यजितसिंह दादा गुजर यांनी निषेध व्यक्त करून लवकरच याविरोधात कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. सदरील वास्तू ही पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असून त्याला 'ब' दर्जा दिला गेला होता. एवढा प्रकार होऊनही पुरातत्व खाते शांत कसे आहेत हे कळायला मार्ग नाही, तटबंदी पाडण्याचे अधिकार स्थानिकांना दिले कोणी ?😠 आणि दुर्दैव म्हणजे हे फक्त स्वार्थासाठी केल्या गेलंय.
एका इतिहासकारांचं वाक्य ऐकलं होतं, "ऐतिहासिक वास्तूच्या चिऱ्यातील एक दगड जरी आपल्या चुकीमुळे निखळला तर आपल्याला इतिहास कधीच माफ करू शकत नाही" आणि खरंतर ज्या गोष्टी आपण निर्माण केल्या नाहीत त्या पाडण्याचा आपल्याला कोणालाच अधिकार नाही.

स्वार्थामागे धावून धावून धावणार तरी किती ? शेवटी तुम्हीही इतिहासातच जमा होणार आहात. स्थानिक त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठली पातळी गाठू शकतात हे आज दिसून आले. आणि हे स्थानिक लोकं जे गढीत रहायचे ते स्वतःला गुजर म्हणवून घेतात पण गुजर हे आडनाव त्यांनी अलीकडे लावायला सुरुवात केली आहे असे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे विद्यमान नागपूर पातीचे वंशज श्री सत्यजितसिंह दादा गुजर यांच्याशी बोलताना समजले. 
विचार करा इंग्लंडमध्ये राजघराण्यातील परंपरेप्रमाणे राज्याभिषेकासमयी त्यांचा पारंपारिक एक दगड आहे ज्यावर बसून काहीतरी राज्याभिषेक विधी चालतो म्हणे, तो दगड एकदा हरवला असता सगळं राष्ट्र बेचैन झालं होतं, तेथील लोकांना स्वतःच्या इतिहासाबद्दल एवढी आपुलकी आहे आणि आपल्या इथे अखंड तट बुरुज पाडले जाताय वैयक्तिक स्वार्थासाठी, केवढं हे दुर्दैव. भावी पिढीला आपण काय इतिहास सांगणार आहोत ?
झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि याची दखल सबंध राज्याने आणि मीडियाने घ्यावी कारण ही घटना किरकोळ नाही, वास्तव काय चालू आहे हे लोकांना कळावं म्हणून हा लेखनप्रपंच !

लेखन : रोहित पेरे पाटील
©इतिहासवेड

0 टिप्पण्या