नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

वैभवशाली प्रतिष्ठाणनगरीच्या मागील भागात आपण बघितलं की शालिवाहन राजांचा देदीप्यमान इतिहास आणि शकांवर विजय प्राप्त करून विजयाचे प्रतीक म्हणून उभारलेला विजयस्तंभ/ तिर्थखांब. त्याचबरोबर प्रतिष्ठाणनगरीचा इ. स. पूर्व शतकातील पुराणग्रंथात त्याचबरोबर शिलालेखात असलेला उल्लेख.
विविध ग्रंथांमधून आढळणारे पैठणचे तत्कालीन उल्लेख यामधून वैभवशाली, संपन्न आणि विविध क्षेत्रांत समृद्ध असलेल्या पैठणचं महत्व लक्षात येतं, इतकंच नाही देवगिरीच्या यादवांच्या काळात पैठणला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं होतं, त्याकाळी व्यापार, शिक्षण, धर्म, कला, आणि संस्कृती या क्षेत्रांत पैठण खूपच नावाजलेलं होतं, दक्षिण काशी म्हणून याची गणना होत होते असं यादवकालीन इतिहास वाचताना लक्षात आलं.
जुन्या पैठणमध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आताचे मुख्य पैठण शहराकडून आपण जेव्हा जुन्या पैठणकडे जातो तेव्हा आपण अधिक उंचावर जात असतो. 
पुढे आम्ही अतिप्राचीन आणि पौराणिक महत्व असलेल्या नागघाटाकडे जाण्यास निघालो, वाटेत काही पुरातन, भग्न वाडे आपल्या उर्वरित अवशेषांसह गतवैभवाची चिन्हे अंगावर मिरवत उभे आहेत, काही वाड्यांचे दरवाजे अजूनही सुस्थितीत आहेत, पण काही वाड्यांचे निखळलेले चिरे बघून मन उद्विग्न झाले, 
पुढे काही अंतरावर प्राचीन अशा नागघाटावर येऊन पोहोचलो.
या नागघाटाचे ऐतिहासिक महत्व असे की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या नागघाटाचा जीर्णोद्धार केला होता. पौराणिक महत्व लक्षात घेता, दंतकथा जास्त ऐकायला मिळतात. त्यापैकीच एक दंतकथा म्हणजे शालिवाहन राजा हा नागवंशी होता व त्या राजांच्या काळात या घाटाला नागघाट हे नाव पडले असं लोक मानतात.
त्याचबरोबर, अजून एक कथा म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीनंतर ब्रम्हदेवाने भूतलावर प्रथमच इंद्रेश्वर मंदिराची निर्मिती प्रतिष्ठाणनगरीत याच नागघाटावर केली. जो कोणी प्राणी या इंद्रेश्वराची पूजा, तप करेल त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होऊन त्याला इंद्रराज्यही मिळू शकते म्हणूनही या मंदिराचं नामकरण इन्द्रेश्वर झालं असंही म्हणतात. तर असं या देवस्थानाचं महत्व आहे. विवाह मंगलाष्टकात सुद्धा ब्रह्मची नगरी प्रतिष्ठाण असा उल्लेख आहे.
                                नागघाट

त्याचबरोबर इ.स. 1287 च्या माघ शुद्ध वसंत पंचमी च्या दिवशी या नागघाटावर एक महत्वपूर्ण घटना घडली, धर्मगुरूंची दक्षिण काशी म्हणून गणल्या गेलेल्या पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली हे आपल्या भावंडांसह मुंजीसाठी (शुद्धीपत्रक) आले होते. नंतर धर्मपंडितांमध्ये चर्चा होऊन संन्याशांची मुले एवढं कारण देऊन त्यांनी माऊलींना शुद्धीपत्रक देण्याचे नाकारले आणि वरून चेष्टा, अपमान देखील केला, मग माउलींनी रेड्यामुखी वेद वदवून त्यांना आपल्या ज्ञानाने दिपवून टाकले ही गोष्ट सर्वांना माहीत असल्याने त्याबाबत मी सविस्तरपणे मांडणी करत नाही.

पुढे शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचा राहता वाडा बघितला, स्वतः नाथ महाराजांचा अधिवास या वाड्यात होता, इथे एकनाथ महाराजांचं मंदिर आहे. गोदावरी काठी असलेलं त्यांचं समाधी मंदिर सर्वांना परिचित आहे आणि गर्दीसुद्धा तिथेच जास्त होते परंतु नाथ महाराजांचा राहता वाडा अनेकांना माहीत नाही. खूप कमी जण इकडे फिरकतात.
काही वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज सुद्धा याच वाड्यात राहायचे पण सध्या ते या वाड्याशेजारील असलेल्या एका वाड्यात राहतात.

पुढे आम्ही ज्या ठिकाणची आतुरतेने वाट बघत होतो म्हणजे ज्यासाठी प्रामुख्याने आलो होतो त्या ठिकाणी गेलो म्हणजेच, 
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी राज्याभिषेक केला असे वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट यांचे वंशज श्री प्रकाश कावळे भट यांना पैठण येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यांच्याकडे छत्रपती घराण्यातील अनेक अस्सल कागदपत्रे उपलब्ध असून त्यांनी अगदी आपुलकीने मला दाखवली, त्याचबरोबर त्यांनी केलेलं आदरातिथ्य वगैरे गोष्टी त्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन पोचवतात, आधी तर वाटलं होतं घरात पण घेतात की नाही कारण अनेक अभ्यासकांना लोकं त्यांच्या घराण्यातील पत्र दाखवत नाही असं अनेक इतिहासकारांच्याकडून ऐकलं होतं त्यामुळे मनात थोडी धास्ती होतीच पण त्यांनी केलेला पाहुणचार बघून खरंच भारावून गेलो, आपुलकीने फलाहार वगैरे दिला.
छत्रपती शिवाजी महाराज पुढे शंभूराजे पासून तर अगदी १८५० पर्यंतच्या सातारकर छत्रपती घराणे, हिंगलीकर, तंजावर, अक्कलकोट येथील भोसले घराण्यातील राजांची पत्रं,  निमंत्रणपत्रं, त्याचबरोबरीने पुरातन शस्त्र आणि वस्तू यांचा केलेला संग्रह खरंच अद्भुत आहे. सोबतच औरंगजेबाचा दुधभाऊ असलेला बहादूरखान याचं एक फारसी पत्र देखील आहे.

          श्री. प्रकाश भट कावळे गुरुजी यांच्यासोबत

(अजूनही खूप कागदपत्रे आहेत पण जागेच्या अभावामुळे मी येथे ती सविस्तरपणे दाखवू शकत नाही, पण लवकरच याविषयी कॅटलॉग तयार करून त्या पत्रांची योग्य ती मांडणी करून, पत्रांसोबतच पैठणचा थोडक्यात इतिहास एका Ebook द्वारे तयार करावा असा माझा मानस आहे, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत महाराजांची अस्सल पत्रं, आणि पैठणचा इतिहास पोचला जाईल.)

 छत्रपती घराण्यातील एवढी अस्सल कागदपत्रे मला गुरुजींमुळे हाताळायला अनुभवायला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंनी यांच्या घरी अनेकदा भेट दिली असल्याचं गुरुजींनी सांगितलं. त्याचबरोबर इतिहास संशोधक मंडळातील अनेक मान्यवर इथं येऊन गेल्याचं ते सांगतात.
यातील छत्रपती संभाजी महाराजांचं एक अस्सल अप्रकाशित पत्र नुकतंच काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालं सदरील अस्सल पत्र त्यांनी पैठणच्याच एका संग्रहालयात भेट म्हणून दिलं आहे.

गुरुजी म्हणाले की काही मोजके थोर इतिहास संशोधक सोडले तर इतर कुणीही ही पत्रं बघायला येत नाही, तुमच्यासारखे पोरं पहिल्यांदा हा ऐतिहासिक ठेवा बघायला आले चांगलं वाटलं. जुनं ते सोनं ही आपल्याकडे म्हण असताना हल्लीच्या लोकांना जुन्या ऐतिहासिक गोष्टी अडगळीच्या वाटतात हेही त्यांनी शेवटी सांगितलं, यातून आपल्याकडे इतिहासाच्या विषयी लोकांची असलेली आस्था दिसून येते.

शेवटी जड अंतकरणाने आम्ही पैठणचा निरोप घेतला, याआधी पैठणला जायचो फक्त नाथषष्ठी यात्रा निमित्ताने, जायकवाडी धरणावर फिरायला यावेळी पैठण वेगळंच भासलं, देदीप्यमान, भव्य आणि सुवर्णकाळ अनुभवलेलं, धार्मिक बाबतीत देशात मानाच्या स्थानावर अढळ असलेलं पैठण त्यावेळी मनात दिसलं.
गोदावरीच्या पवित्र नदीकाठी वसलेलं, २००० वर्षांपेक्षाही अतिप्राचीन, देदीप्यमान, भव्य इतिहास असलेलं पैठण प्रत्येकाने एकदा नक्कीच बघावं.
हा लेख जरा, प्रवासवर्णनपर वाटू शकतो कारण यामध्ये मी अनुभवलेलं पैठण मांडलंय.


टीप : पैठणला जाऊन आल्यावर मी प्रकाश भट कावळे यांच्याकडील छत्रपती घराण्यातील अस्सल पत्रे सर्वांना बघता यावी म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट केली होती, त्या पोस्टला आपण खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद, मला त्यामुळे महाराष्ट्रभरातून कौतुकास्पद फोनकॉल्स, मेसेजेस येत गेले, अनेकांनी मला कावळे गुरुजींचा संपर्क क्र. विचारला अर्थातच माझ्याकडे तो नव्हता म्हणून कुणाला देण्याचा प्रश्न नव्हता. पत्ता सांगितला मी अनेकांना पण एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, सध्या आमच्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय, कावळे गुरुजींचं वय लक्षात घेता त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकदम भेटावं हे योग्य ठरणार नाही, जसा कोविडचा प्रादुर्भाव कमी होईल तेव्हा भेटण्यास काही हरकत नाही. आपण सुरक्षित राहून त्यांच्याही आरोग्याशी खेळ नको म्हणून हे मत मांडलं.
     
                                 धन्यवाद !

लेखन -  रोहित पेरे पाटील
       ©इतिहासवेड

1 टिप्पण्या