क्रूर निजामाच्या रझाकारी सेनेला जेरीस आणणारे अज्ञात वीर - स्वातंत्र्यसैनिक सखाराम पेरे पाटील
हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहास हा अत्यंत भयानक आणि रक्तरंजित असा आहे. या लढ्यात अनेक क्रांतिकारक आणि अज्ञात वीरांनी मोलाचं योगदान देऊन मराठवाडा म्हणजेच एकूणच हैद्राबाद संस्थान पारतंत्र्यातून मुक्त केलं.
निजामाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया,
१७२४ मध्ये मुघलांचा सुभेदार असलेल्या मीर कमरुद्दीन याने बंड करून स्वतः ला बादशहा घोषित करून निजाम वंशाची स्थापना केली. राजा रावरंभा निंबाळकर व इतर काही मराठी सरदाराच्या मदतीने त्याला महाराष्ट्रात सत्ता प्रस्थापित करणे सोपे गेले.
मीर कमरुद्दीन /निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले.
या निजामाने सुरुवातीला प्रत्येक सत्ताधीश जसे की मराठे, नंतर इंग्रज, फ्रेंच यांच्याशी नरमाईचे धोरण अवलंबिले. कुठेही हार दिसली की हा तह करून मोकळा व्हायचा आणि खंडणी द्यायची वेळ आल्यावर नकार द्यायचा.
चौथाई फक्त कागदावरच दाखवायची असं याचं धोरण होतं. राज्य टिकवण्यासाठी आणि राज्य नवीनच असल्याने कुठं बंडखोरी होऊ नये म्हणून हिंदूंविषयी तो सहिष्णू राहिला. कारण एकूणच हैद्राबाद संस्थानात ८५℅ जनता ही हिंदू होती म्हणजेच बहुसंख्य होती. हैदराबाद संस्थानात आजचा मराठवाडा हा विभागही होता.
हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे निजामाचे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळ बगदादचे होते.
इ.स. १९०२ -०३ यानंतर च्या निजामांनी मात्र हिंदू सहिष्णू धोरण अलगदपणे बाजूला सारले आणि नंतर सूरु झाला हैद्राबाद आणि मराठवाड्यातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार आणि छळ. हिंदूंनी सण सार्वजनिक पातळीवर साजरे करू नये, घरातील पूजेचा आरतीचा आवाजही बाहेर येऊ नये, नवीन मंदिरं बांधू नये. हे नी असे अनेक बंधनं हिंदूंवर लादण्यात आली. धर्मांतरासाठी होणारा छळ तर नित्याचाच होता. संस्थानात इयत्ता तिसरी पासूनच उर्दू माध्यामातून शिक्षण बंधनकारक होते, पाठ्यक्रमाची रचना धर्मांधता वाढवणारी होती, दररोज सकाळी ‘ताबत खालिक आलम’ हि निझामाची स्तुती मुलांकरवी गाववली जायची; यांतून मुलांवर संस्कार ते काय होणार?
शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान हा होता. अत्यंत क्रूर अत्याचार याच्याच काळात झाले. तत्कालीन जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून याला संबोधले गेले.
१९२७ - २८ मध्ये स्थापन झालेल्या ऑल डंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीन (All Indi Mailis-e-Ittehadul Muslimeen) आजची (AIMIM) ही संघटना याच निजामाच्या मदतीने सुरू झालेली. या संघटनेच्या सभासदांना रझाकार असे म्हणल्या जात असे हे रझाकार इतके जुलमी होते की जनता यांच्या नावानेच कापायची. रझाकार हे निजामाचं लष्कर होतं. या संघटनेचा म्होरक्या होता कासीम रिझवी अत्यंत कडवा सैनिक, धर्माध आणि जुलमी रझाकारी सेनेने अत्याचाराची परिसीमा गाठली, शेतीवर आकारणारे कर बेसूमार पद्धतीने वाढवले, इतर अन्यायाची तर गोष्टच निराळी सर्वसामान्यांची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ ही मराठवाड्यातील प्रमुख क्रांतिकारक नेतृत्व यांनी मराठवाड्यातील जनतेच्या मनात स्वातंत्र्याच स्फुल्लिंग चेतवलं गावागावांत उठाव झाले, अनेक अज्ञात वीरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणसमिधा क्रांतीयज्ञात अर्पण केल्या.
याच सुमारास छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्यातील पाटोदा या गावातील एक तरुण राष्ट्रसेवेसाठी तत्पर झाला, त्यांचे नाव स्वातंत्र्यसैनिक सखाराम पेरे पाटील अर्थातच माझे चुलत आजोबा. समाजकारण हा पिंडच असल्याने लोकांच्या समस्या निवारण करण्यातच त्यांना धन्यता होती, घरची परिस्थिती जेमतेमच परंतू लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करावं ही तळमळ त्यांना स्वस्थ बसु देईनात, शेतीवर जबरदस्तीने आकारल्या जाणारा कर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा होता, तो कर काहीही करून कमी व्हायलाच हवा असं यांच्या मनात नेहमी वाटे, ते हैद्राबाद या राजधानीच्या ठिकाणी गेले, तिथं काही अधिकाऱ्यांना भेटून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची व्यथा मांडली व कर भरण्यासाठीची त्यांची आर्थिक कुवत नाही हे सांगितलं, बऱ्याच प्रयत्नांनंतर शेतपट्टीकराचा बोजा जरा हलका झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांना तेव्हा त्यांनी मोठा दिलासा दिला होता, शेतीचं झालं ; मात्र रझाकाराचे धार्मिक अत्याचार वाढत चालले होते तेव्हा आजोबांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवत स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्य नेतृत्वाखाली हैद्राबाद मुक्तिसंग्रामाच्या सशस्त्र क्रांतीलढ्यात उडी घेतली.
सूरुवातीला त्यांनी सिल्लोड वगैरे भागात रझाकारी सैन्याचा धुव्वा उडवला, मुक्तिसंग्रामातील प्रमुख नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी रझाकाकारी सेनेच्या मार्गात अडथळा आणणे, गावोगावी जाऊन तिथल्या लोकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रोत्साहित करणे, निजामाच्या दळणवळणासाठी उपयोगात असणाऱ्या रेल्वे ट्रॅक्स उध्वस्त करून भूमिगत होणे, व निष्पाप लोकांचे रझाकारांपासून प्राण वाचवण्यासाठी रझाकारी सैन्याच्या तळावर हल्ले करणे हे त्यांचं मुख्य काम होतं. या मुक्तिसंग्रामलढ्यात त्यांचे सहकारी होते स्वातंत्र्यसैनिक बाबाराव जाधव आणि स्वातंत्र्यसैनिक लालाजी जैस्वाल, या सशस्त्र क्रांतीमुळे आजोबांनी काही वेळा तुरुंगवासही भोगला होता रझाकारी सैन्याकडे अत्याधुनिक बंदुकी होत्या तर आजोबांकडे होत्या भाले आणि तलवारी.
एकदा असाच एक प्रसंग होता, कोलते टाकळी या गावात रझाकारी सैन्यानं धुडगूस घातला, माणसं मारल्या जाऊ लागली, महिला मुलींवर अनन्वित अत्याचार होऊ लागला, त्यावेळी आजोबांची छावणी तिथून जवळच होती त्यांना या घटनेची बातमी मिळाली व ते तडक आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले. कोलते टाकळीच्या डोंगराचा आश्रय घेत घेत ते त्या गावाजवळ आले व रझाकारी तुकडीसोबत त्यांची चकमक उडाली, त्यावेळी लोकांना वाचवताना त्यांच्या पायाला एक गोळी चाटून गेली, असे कितीतरी प्रसंग सांगता येतील.
पुढे भारताच्या स्वातंत्र्याला एक वर्ष होऊन गेलं होतं तरी हैद्राबाद अजून निजामाच्या पारतंत्र्याच्या बेडीत अडकलेलं. संस्थान विलीनीकरणाला निजामाचा विरोध
होता. त्याला पाकिस्तान सारखं स्वतंत्र राष्ट्र हिंदुस्थानच्या पोटात निर्माण करायचं होतं. स्वामी रामानंद तीर्थ आणि इतर मोठ्या नेत्यांनी पंडित नेहरूंकडे या विषयावर अनेकदा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी याकडे दुर्लक्ष करून या विषयावर मौन धारण केलं. पण स्वामी रामानंद तीर्थ यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना याबाबत विनंती केली. सरदार वल्लभभाई पटेल यांनी लगेचच भारतीय सेनेला पाचारण करून निजामाविरोधात पोलीस एक्शनला सुरुवात केली, १४ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्यातील देवगिरी किल्ला भारतीय सेनेने ताब्यात घेऊन तिथल्या भग्न देवालयात भारतमाता मंदिराची स्थापना केली. 13व्या शतकानंतर प्रथमच देवगिरीने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला. त्यावेळी आजोबा देवगिरी किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवणाऱ्यांमधील एक होते.
पुढे तीनच दिवसांत निजाम पूर्णत: शरण येऊन संस्थान स्वतंत्र भारतात विलिनीकरणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे हैद्राबाद आणि मराठवाड्यावर लाख उपकार आहेत, ज्यांच्या धमकीने आणि सशस्त्र कारवाईने हा निजाम शरण आला होता. १७ सप्टेंबर १९४८ साली भारतीय लष्कराने केलेल्या पोलीस कारवाईत निजाम शरण आल्यावर कासीम रेझवीला अटक झाली. नंतर सूटल्यावर तो कायमचा पाकिस्तानात गेला. पण जाण्यापूर्वी संघटनेची सूत्रे वकील अब्दुल वहाद ओवैसी याच्याकडे दिली, पुढे ही संघटना पक्षात बदलली आणि याच्याच घराण्यात पक्षाची सूत्रे राहिली.
स्वातंत्र्यसैनिक सखाराम पेरे पाटील यांना १९६१ मध्ये छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्यातील भारतीय काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं. पुढे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व दिल्ली येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांचा मुक्तिसंग्राम लढ्यातील योगदानाबद्दल भव्य सत्कार देखील झाला होता.
त्यांचा मृत्यू १७ ऑक्टोबर १९८७ रोजी वृद्धापकाळाने
झाला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपलं योगदान दिलं ज्यांच्या ऋणातून हैद्राबाद आणि मराठवाडा कधीही उतराई होऊ शकत नाही त्या असंख्य क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकांना आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन
- लेखन : रोहित पेरे पाटील
इतिहासवेड

0 टिप्पण्या