नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

इंग्रजी नवीन वर्ष आलंय पण आपलं म्हणजेच मराठी नवीन वर्ष चालू होतं ते गुढीपाडव्याला. पण काही जणांकडून आणि व्हॉट्सअँपवर गुढीपाडव्याविषयी एक अपप्रचार या दिवसात चालू असतो.

त्यासंदर्भात मला आजचा लेख लिहावासा वाटला.

गुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” वगैरे बाजारगप्पा आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटी चा आपण आज निकाल लावू.


आधी आपण गुढीपाडवा म्हणजेच शालिवाहन शक कालगणना कशी सुरू झाली ते पाहू,

सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते. यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण (जुने नाव प्रतिष्ठान ) ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैकी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती असेही दिसून येते. या कारणामुळे इतिहास संशोधक त्यांना महाराष्ट्राचे राजे मानतात. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामात सातवाहन राजांनी कोरीवकामासाठी दान दिले असा उल्लेख येतो. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा ‘सातवाहन’ हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. सातवाहनांच्या राजवटीतच महाराष्ट्रात सुवर्णकाळ होता असेही मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली.  प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची महाराष्ट्रातील राजधानी होती.चंद्रवंशी यादव कुळातील राजा सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आलेले आहेत काही सातवाहन राजे यांच्या नावाची आईचे नाव लावत असत. जसे की गौतमीपुत्र सातकर्णि सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी यांची माता गौतमी बलश्री येणे गौतमीपुत्र सातकर्णि याचा गौरव केलेला आहे शक पलव व ग्रीक यांचे निर्दालन करणारा तसेच सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा व ज्याचे घोडे तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले आहेत असा उल्लेख नाशिक येथील शिलालेखांमध्ये गौतमीपुत्रच्या मातेने केलेला आहे या उल्लेखावरून गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व दक्षिणेतील अनेक राजांनी स्वीकारलेले होते असे दिसते ,सातवाहन शासकांची राजवट ही महाराष्ट्रामध्ये प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न राहिलेली आहे सातवाहन शासक हे प्रजा प्रेमी लोककल्याणकारी राजे होते या काळामध्ये महाराष्ट्राची एकूणच मोठी प्रगती घडून आली संस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राला या काळामध्ये वैभव संपन्नता प्राप्त झाली. 

   सातवाहनांचा शिलालेख


सातवाहनांची नाणी

तर अशा प्रकारे शालिवाहनांनी शकांचा पराभव ज्या दिवशी केला त्या दिवसापासून त्यांनी शालिवाहन शक सुरू केला ( आजही आपले सर्व सणोत्सव यानुसारच साजरे केले जातात) आणि त्याच दिवसाला गुढीपाडवा म्हणतात.

गुढीपाडवा आणि छत्रपती शंभूराजे:

छत्रपती संभाजीराजेंचा मृत्यू हा गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी झाला होता (मृत्युंजय अमावस्या).

काही स्वयंघोषित इतिहासकार म्हणतात की ब्राम्हणांनीच शंभूराजे यांची हत्या केली होती आणि तेव्हापासूनच गुढीपाडवा हा सण साजरा केल्या जातो.

या बिनबुडाच्या आरोपाचे खंडन करूया :

वर्ष १६८९ मध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फाल्गुन अमावास्येच्या दिवशी हालहाल करून मारले. दुसर्‍या दिवशी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन होता. हिंदूंनी तो साजरा करू नये, असा औरंगजेबाचा त्यामागे हेतू होता. वस्तूतः हत्येचा गुढीपाडव्याच्या दिवशी उभारल्या जाणार्‍या गुढीशी काहीच संबंध नाही. प्रभु श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, तेव्हापासून गुढ्या उभारणे, तोरणे लावणे, ही आपली परंपरा आहे. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणूनही गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केल्याचे मानले जाते. म्हणजेच खरे तर हा दिवस केवळ हिंदूंचाच नसून अखिल विश्‍वातील मानवजातीचा आहे.

२. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, हा सर्वश्रुत इतिहास आहे. अनेक ठिकाणी तो संदर्भांसह उपलब्धही आहे. आजपर्यंत एकाही इतिहासकाराने ‘छत्रपती संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी मारले’, असे म्हटलेले नाही. असे असतांना ‘क्रूरकर्मा औरंगजेबाचे पाप झाकण्याचा प्रयत्न काही जात्यंध का करत आहेत ?’ असा प्रश्‍न हिंदूंनी त्यांना खडसवून विचारला पाहिजे.


गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया-

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

मार्गशीष शुद्ध १ विरोधीनाम सवंस्तर शके १५७१ अथवा सुहूर सन खसेन अलफ, सोमवार दिवसी राजेश्री नीलकंठराऊ यासी.. कासाराचे घरी गुढीयाचा पाडवा व चैत्री पुनीव (चैत्र पौर्णिमा) व स्रावणी पिणीव (श्रावणी पौर्णिमा) व कुलधर्म करील तेथे हाक उतपन फळावर येईल तो तिघी जणी वाटोण घेणे.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.

३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

यापूर्वीही काही जात्यंधांनी ‘ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांचा खून केला’, असा आरोप केला होता. त्याला हिंदूंनी दाद लागू दिली नाही. गुढीपाडव्याविषयी या जातीद्वेषमूलक प्रसारालाही दाद लागू न देता ‘हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडवा साजरा करून धर्माचरण करा ! तो अधिकाधिक हिंदूंनी शास्त्रशुद्धपणे साजरा करणे’, हीच जात्यंधांना चपराक असेल !

कलश :

आज काही जणांकडून हे सांगितल्या जातं की गुढीवर लावण्यात येणारा उलटा कलश हे अशुभ आहे वगैरे. त्यासाठी मी हे पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की गुढी ध्वज आहे विजयी पताका आहे. आणि आपण जर भगवा ध्वज बघितला तर त्यावर सुद्धा आपल्याला कलश दिसून येतो.


१२ व्या शतकापासून या महाराष्ट्रात जी यवनी आक्रमणं झाली तेव्हा आपला धर्म संपवण्याचा प्रयत्न झाला होता आणि आजही होतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुढीपाडवा हा सण साजरा केला जात होता. शिवकाळाच्या आधीही गुढीपाडवा साजरा करण्यात येत होता.

काही मंडळी समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करून खोटा इतिहास पसरवतात त्यांच्यापासून सावध रहा.

अजून महत्वाचे म्हणजे, छत्रपती शिवरायांच्या दोन्हीही, सातारा आणि करवीर घराण्यांमध्ये त्यांचे विद्यमान वंशज गुढीपाडवा साजरा करतात.

न्यू पॅलेस कोल्हापूर 

 


जलमंदिर पॅलेस सातारा


 त्यामुळे मित्रांनो ३१ डिसेंबर ही आपली परंपरा नसून गुढीपाडवा हेच आपलं नववर्ष आहे. आणि खोट्या इतिहासाला बळी पडून आपल्याच धर्मावर चिखलफेक करू नका. संस्कृती जपा । यासाठीच हा लेखनप्रपंच.

धन्यवाद !


लेखन : रोहित पेरे पाटील

© इतिहासवेड


संदर्भ : 

शिवकालीन पत्रसार संग्रह

श्री. रामदासांची कविता खंड १

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २०

शिवचरित्र साहित्य खंड १

7 टिप्पण्या

  1. वाईट याच गोष्टींचं वाटतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याच हिंदू बांधवांना समजाऊन सांगाव्या लागत आहेत , आपला धर्म परकीय आक्रमणापासून कमी आणि स्वकीय आक्रमणापासून जास्त बदनाम केला गेला , या सगळ्या जात्यंधांना लवकर बुध्दी मिळू हीच प्रार्थना 🚩🙏

    उत्तर द्याहटवा
  2. मुळात समाजात तेढ निर्माण करणारे लोक हे आपल्यातीलच आहेत याचेच वाईट वाटते...��

    उत्तर द्याहटवा
  3. गुढी पाडवा बद्दल तुमच्या मताशी मी सहमत आहे पण तुकोबा रायांच्या मृत्यू बद्दल आधिक माहिती देणारा लेख लिहलात त र छान वाटेल

    उत्तर द्याहटवा