नमस्कार मित्रांनो, जय शिवराय.


सोशल मीडिया हे खरंतर एक खूप प्रभावी माध्यम आहे, आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्याचे. पण त्याचा कसा उपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. त्याचा विधायक आणि विघातक कारणांसाठीही वापर होतो.
विधायक उपयोग केला तर त्याच्यासारखे ज्ञानाचे भांडार नाही आणि विघातक कामं तर सांगणच नको.

व्हॉट्सअप हे आता एक विद्यापीठ झालंय हे आता तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, त्यावर कुणीतरी काहीतरी लिखाण करतं, वाचणारे वाचून कुठलीही शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यातल्या त्यात ऐतिहासिक माहिती ही खूपदा व्हायरल होत असते, लोकं फॉरवर्ड करत असतात. आणि ही ऐतिहासिक माहिती मनात एकदा कोरल्या गेली की नंतर ती पुसून काढणे अवघड असते. 

आजची पोस्ट अशाच एका आलेल्या  आधारित असून हा मेसेज व्हॉट्सअप वर वारंवार व्हायरल होत असतो, 
तो म्हणजे प्रतापगड किल्ल्यावर असणाऱ्या भवानी मातेच्या मंदिरात असलेली तलवार.

व्हॉट्सअप वर ही तलवार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची असून त्यांनी प्रतापगडच्या युद्धात एका दिवसात ६०० शत्रूंना मारले म्हणून त्या तलवारीवर ६ शिक्के आहेत असं सांगितलं जातं तर एका मेसेज मध्ये तर दुसरीच तलवार दाखवून हीच सरसेनापती हंबीरराव यांची तलवार आहे असं सांगितलं जातं.

उपरोक्त चित्रात दाखविल्याप्रमाणे ह्या तलवारी सरसेनापती हंबीररावांच्या असल्याचं सांगितलं जातं.
पण याची शहानिशा न करता अनेक जण त्या मेसेजलाच खरा इतिहास समजून बसतात आणि फॉरवर्ड करतात.
पण या गोष्टींमुळे अज्ञात वीर अंधारातच राहतात.
चित्र क्रमांक २ मध्ये असलेली तलवार कुणाची आहे तेच माहीत नाही. कारण ती तलवार वेगळ्याच शैलीतील आहे. 

चित्र क्रमांक १ मधील तलवार ही मराठा धोप या प्रकारातील असून या तलवारीचा सत्य इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे मित्र आणि इतिहास अभ्यासक संकेत पगार यांनी केला असता त्यांनी संदर्भासहित या तलवारीबद्दल असणारे गैरसमज दूर केले.


मग काय आहे वास्तव ?

प्रतापगडावरील भवानी माता मंदिरात असलेली ही मराठा धोप सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची नसून, शंभूराजेपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे सरदार असलेले कान्होजी मोहिते हंबीरराव यांची आहे. 
'हंबीरराव' हा किताब आहे जो मोहिते घराण्यातीलच कान्होजी यांना होता, ज्याप्रमाणे मोहिते घराण्याला पूर्वापार 'बाजी' हा किताब होता त्याचप्रमाणे कान्होजींना 'हंबीरराव' हा किताब होता.
मुख्य म्हणजे त्या तलवारीच्या पाठीवर 'कान्होजी मोहिते हंबीरराव' ही सोन्याची अक्षरे असलेला स्पष्ट उल्लेख आहे.

आता तुम्ही म्हणाल मग प्रतापगडावर त्या तलवारीसमोर तर सरसेनापतींचा उल्लेख आहे मग? तो उल्लेख असलेली पाटी अलीकडच्या काळातील आहे.

हे सर्व करण्याचा एकमेव उद्देश हा फक्त आणि फक्त अज्ञात वीरांना प्रकाशात आणणे हाच आहे.
जरी ही तलवार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची नसली तरी त्यामुळे त्यांचं शौर्य आणि पराक्रम यामुळे तसूभरही कमी होत नाही.

||सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि कान्होजी मोहिते हंबीरराव यांना आपल्या परिवारातर्फे मानाचा मुजरा ||

धन्यवाद !

लेखन :  रोहित पेरे पाटील

संदर्भ : हंबीरराव मोहिते - डॉ. सदाशिवराव शिवदे

0 टिप्पण्या