पानिपत हा खरंच पराभव होता का की होती एक अजोड शौर्यगाथा ?
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आज १४ जानेवारी. आजच्याच दिवशी १७६१ साली पानिपतावर युद्ध झालं.
त्यानिमित्ताने मी आज पानिपताविषयी बोलणार आहे.
हा ब्लॉग लिहताना आज फक्त मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणार आहे कारण आज शौर्यदिन आहे, युद्धाची कारणमीमांसा करण्याचा हा दिवस नव्हे.
संक्रांत आली की आठवतं पानिपत.
१७६१ ची संक्रांत, महाराष्ट्रात असाच तिळगुळ आणि गोडधोडाचा स्वयंपाक चालू होता, लोकं एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छांची देवाण- घेवाण चालू असतानाच महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर उत्तरेत कडाक्याच्या थंडीत लाखो मराठे गनिमांना धूळ चारत होते.
अब्दाली सारखा क्रूर अफगाणी शासकाची हिंदुस्थानावर वाकडी नजर होती, तो ही भूमी जिंकायला आला होता.
उत्तरेतल्या मी मी म्हणणाऱ्या राजांनी अब्दाली आला म्हटल्यावर तोंड गप्प करून बसले.
मराठ्यांनाही महाराष्ट्रात आपल्या वाड्यात आराम करत राहता आलं असतं, कारण आक्रमण तर दूर दिल्लीवर होणार होतं आणि आजच्यासारखी राष्ट्र ही संकल्पनाही त्याकाळी नव्हती पण मराठ्यांना या परिस्थितीची जाणीव होती की आज जर दिल्लीच्या म्हणजेच एकूणच देशाच्या रक्षणासाठी आपण गेलो नाही तर उद्या हा प्रदेश जिहादी होऊन जाईल.
त्यावेळी उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत, झाडाची पाने खाऊन, उपाशीपोटी मराठे जीवाची पर्वा न करता प्राणपणाने लढले. इथं प्रत्येक मावळ्याचं नाव नाही घेणार कारण संख्या लाखात आहे.
मराठा साम्राज्याच्या माथ्यावरची भळभळणारी जखम असं या घटनेचं वर्णन केल्या जातं.
हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता, चौथाईसाठी मराठे लढले नव्हते तर राष्ट्ररक्षणासाठी ते लढले होते.
पानिपत का झालं याची कारणं शोधण्यापेक्षा मराठे ते युद्ध लढले नसते तर आज काय भीषण परिस्थिती असती याचा विचार जर केला तर गर्व वाटेल आपणा सर्वांना की आपले पूर्वज या राष्ट्रावर येणारे परकीय आक्रमण थोपवून धरण्यासाठी प्राणपणाने लढले होते, ते जर लढले नसते तर भारत आज जिहादी देश असता.
मान्य आहे या युद्धात मराठे हरले पण अब्दाली तरी कुठं जिंकला ?
या लढाईनंतर तो रिकाम्या हाताने अफगाणिस्तानला परतला आणि पुन्हा कधीही भारताकडे वाकड्या नजरेने त्याने बघितलं नाही. पानिपत झालं पण याचा दूरगामी परिणाम असा झाला की पुढच्या काही वर्षांतच दिल्लीवर सलग १५ वर्ष भगवा फडकत होता.
महादजी शिंद्यांनी नजिबाचा पत्थरगड त्याच्या कुटुंबकबिल्यासह मारला, नजीब हा त्याआधीच वारला होता. पत्थरगडावरील नजिबाची कबर फोडून त्याचा मुडदा हाडं भस्मसात करून त्याची राख महादजींनी उधळली होती आणि पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या प्रत्येक वीरांचा बदला त्यांनी अवघ्या दहा वर्षातच घेतला.
आता काहीजण म्हणतात की यांच्यामुळे पानिपत झालं, त्यांच्यामुळेच झालं याचे कारण शोधण्यात काही अर्थ नाहीये कारण तो इतिहास आहे जो होऊन गेलाय,
आज मराठ्यांच्या शौर्याचा दिवस आहे त्यामुळे प्रश्न हा आहे की जर इतर राज्यांप्रमाणे मराठयांनी शांत बसणं पसंद केलं असतं तर ?
मराठे जर पानिपतात लढले नसते तर अब्दाली हा भारताचा शासक झाला असता आणि अफगाणिस्तानच्या सीमा महाराष्ट्राला येऊन भिडल्या असत्या म्हणजे एकूणच काय तर आजचा भारत हा जिहादी देश असता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी निर्माण केलेलं हे राज्य त्यांच्या पुढील पिढ्यांनी राखलं नुसतं राखलंच नाही तर विस्तारित केलं.
या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एक माणूस पानिपतावर गेला होता, जे कोणी हा लेख वाचताय तुम्हाला अभिमान हवा की आपले पूर्वज हे एवढ्या लांब कडाक्याच्या थंडीत फक्त आणि फक्त आपल्यासाठी या राष्ट्राच्या रक्षणासाठी लढले होते.
#हिंदुस्थानचे_रक्षणकर्ते_मराठे🚩⚔️
लेखन : रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड
0 टिप्पण्या