नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहायला घेतोय, आजचा हा ब्लॉग ऐतिहासिक ठिकाणी भटकंतीपर वर्णन असणारा आहे. 

तर झालं असं की श्री क्षेत्र देवगड येथे दर्शनासाठी गेलेलो होतो व परत येताना श्री क्षेत्र सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे भेट द्यायची असं ठरवलं. 
एप्रिलच्या कडक उन्हाळ्यात ऊन मी म्हणत होतं. आणि अखेर सिद्धेश्वराचा तो दिशादर्शक फलकाजवळून डावीकडे आत शिरलो आणि मन केव्हाच ऐतिहासिक अन पौराणिक जगतात जाऊन पोचलं एवढा नयनरम्य अगदी निसर्गचित्र शोभावं असा तो परिसर. 

पुलावरून जाताना उन्हाळा आहे हे काही क्षण विसरायला होतं. कारण खालून संथपणे वाहत जाणारी प्रवरा गोदामाईच्या दिशेने उत्कटतेने धाव घेताना पाहून असं राहून राहून वाटतं की सासुरवाशीण मुलीला आपल्या माहेरची ओढ लागून राहिलीये.
ते एक सुखद दृश्य बघून पुढे जाताना मंदिराचा कळस खुणावतो. 
      
मंदिरासमोर आल्यावर भव्य चिरेबंदी प्रवेशद्वार आपलं स्वागत करण्यास उभा असतो. त्यातून आत गेल्यावर जे मंदिराचं प्रांगण दिसतं ना ते बघताना तर अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जावं.

मंदिर हे पेशवेकालीन आहे पण शिवलिंग हे अति प्राचीन आहे.
पूर्वी हा भाग दंडकारण्यात असताना प्रभू श्रीरामचंद्रांनी सुवर्ण हरीण म्हणजेच मारीच राक्षसाला याच ठिकाणी मारलं आणि हे काम सिद्ध झालं म्हणून श्रीरामांनी सिद्धेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठापणा केली अशी आख्यायिका आहे. 
पुढे महाराष्ट्रात कोसळलेल्या अनेक यवनी आक्रमणामुळे अति सुंदर अशा मंदिरांचा विध्वंस झाला.
पुढे पेशवेकाळात या मंदिराची उभारणी झाली, यादवकाळानंतर उत्तमोत्तम मंदिरं आणि शिल्पकलेची जी वानवा झालेली होती, तशी शिल्पकला नंतर लोप पावत गेली. पेशव्यांनी या मंदिराच्या उभारणीवेळी शिल्पकला, नक्षीकाम यामध्ये कुठलीही कमतरता ठेवली नाही. प्रत्येक शिल्पाचं काम करताना ते अगदी जीव ओतून केल्यासारख वाटतं. जणू काही ते निर्जीव दगड नसून बोलकी शिल्प आहेत एवढी जिवंत ती भासतात. हे सगळं बघताना नकळतपणे महाराष्ट्राला दगडांच्या देशा असं का म्हणलंय हे कळून येतं. 
प्रांगणात तीन देवळं आहेत त्यामध्ये देवीचं, भगवान विष्णू आणि मध्यभागी भव्यदिव्य असं श्री सिद्धेश्वराचं. 
आणि हे संपूर्ण राऊळ भव्य अशा तटाबुरुजांच्या भिंतींनी  बंदिस्त असून एका बाजूस सुंदर अशा नक्षीकामांनी मढवलेल्या महिरपिंची सुरेख ओवरी होती. 
बाजूला शेंदूर फासलेल्या मारुतीरायाची आणि गणपतीची मूर्ती राऊळात कोंदनाप्रमाणे शोभिवंत दिसत होती.

मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कोरीव दगडी महिरपीच्या छताखाली स्थित असलेल्या भव्य नंदीचे शिल्प पाहताक्षणी नजरेत भरतं. 
समोरच जय आणि विजय हे दोन द्वारपाल अदबीने उभे असतात, त्यांच्याकडे बघतच आपण सभामंडपात प्रवेश करतो ज्याची भव्यता घुमटाकार छताकडे बघताच येते. मुख्य गाभाऱ्यात शिरताना जणूकाही धीरगंभीर पण तेवढंच शांत, पवित्र वातावरण अनुभवून अंतरात्मा सुखावतो. शिवलिंगावर लख्ख पितळी नाग असून अशा त्या पवित्र शिवलिंगासमोर दोन घटका ध्यानस्थ होताना प्रभू श्रीरामचंद्र यांना आठवून मन रामायणकाळात जायला होतं.
मंदिराबाहेर विविध पौराणिक कथा, दशावतार शिल्पपट्टी अशी एकाहून एक सुरेख शिल्प कोरलेली आहेत.
(प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण रावनवध करताना आणि हनुमंत अशोकवाटिकेतील वृक्ष उपटून रावणावर फेकताना)

( स्तंभातून प्रकट होऊन भगवान नृसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडताना)

( श्री सिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी हत्तीच्या अंबारीतून येताना श्रीमंत नानासाहेब पेशवे )

अशी एक ना अनेक शिल्प इथं आहेत परंतु विस्तारभयास्तव ती सगळी इथं मांडणं शक्य नाही.

बाहेर येताना समोर एक प्रचंड अशी घंटा टांगण्यात आलेली आहे, पेशव्यांच्या वसई विजयाची ती निशाणी आहे कारण त्यावर मदर मेरीचं चित्र कोरलेलं असून १७३० हा बहुदा निर्मिती सालचा आकडा कोरलेला दिसून येतो.
मागील दरवाजाने बाहेर पडताना आपण नदीकाठ अन घाटाकडे जाऊ लागतो.
( नदीघाटावर अनेक धार्मिक विधी होत असतात, लॉकडाऊनचा कालावधी असल्याने घाट परिसरात जाण्यास बंदी होती त्यामुळे इच्छा असूनही तिथं जाता आलं नाही )

उत्तरेत पेशव्यांच्या ज्या स्वाऱ्या व्हायच्या त्यावेळी पेशवे इथं मुक्कामाला थांबायचे असं स्थानिकांनी सांगितलं. त्याचबरोबर नदीच्या घाटावर नाना फडणीस यांचा देवनागरीतील शिलालेख आहे.
सांगण्यासारखं आणि वर्णन करण्यासारखं खूप आहे पण शब्द अपुरे पडतात.
शेवटी हेच सांगावसं वाटतं, की अप्रतिम अन सुरेख कोरीवकाम, जिवंत बोलकी शिल्पं बघून अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जाणारं असं हे ठिकाण आहे, एकदा नेहमीच्या हमरस्त्यावरून या पुरातन वास्तुकडे वाट वाकडी करून या, कारण या मंदिरात चकचकीत मार्बल वगैरे नाहीये पण अंतरात्म्याला सुखावणारा पावित्र्याचा गंध आहे.

लेखन : रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड™

( टीप : घाट परिसरावर जाण्यास बंदी असल्याने तिथले काही फोटोस गूगल वरून घेतलेले आहेत )

8 टिप्पण्या

  1. इतिहास वेड या ब्लॉगवर आज प्रथमच या प्राचीन अशा सिध्देश्वर मंदिराची पौराणिक कथा वाचून खूप आनंद झाला ... रोहित पेरे यांची लिखाणाची भाषा आणि शब्दातील भावार्थ हा मनाला वेड लावणारा आहे , अशीच आपली वाटचाल सुरू राहावी ह्याच शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. रोहित जी, पोस्त छान आहे. पण या परिसरात नवीन असलेल्या माझ्यासारख्या लोकांना हे मंदिर कुठे आहे हे कळतच नाही आहे. त्यामुळे अशा पोस्ट लिहिताना माझ्यासारख्या अडाण्यांना जमेला धरून तुम्ही लिहीत असलेल्या स्थळाचा पत्ता दिला तर बरे होईल. हे सिद्धेश्वर महादेव मंदिर कुठे आहे?

    उत्तर द्याहटवा
  3. कृपया स्थळाची माहिती द्यावी

    उत्तर द्याहटवा
  4. ᐈ Casino site ᐈ Online Casino site ᐈ 【 LuckyClub Casino
    【 Welcome bonus 】 | ⚡ Casino luckyclub.live Site | ✪ Best Online Casino | ❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮❮.

    उत्तर द्याहटवा