नमस्कार मित्रांनो, जय शिवराय

इतिहासात डोकावताना अनेक अज्ञात घटना, प्रसंग त्यात दिसून येतात.
तर झालं असं की शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ वाचत असताना storia do mogor (असे होते मोगल) हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं त्याचा लेखक म्हणजेच तत्कालीन इटालियन प्रवासी जो की पुढे मुघल दरबारात त्याने नोकरी केली असा निकोलाय मनूची याने त्याला १७ व्या शतकात भारताच्या भ्रमंतीवर असताना आलेले अनुभव किंवा निरीक्षण नोंदी त्याने आपल्या storia do mogor या पुस्तकात नमूद केल्या आहेत.
तर हा प्रसंग आहे तो भारतात येताना सुरत शहरात आला तेव्हाचा, तो जाणून घेऊयात मनूचीच्याच शब्दांतून.
तो लिहतो,
       मी येथे जहाजातून उतरलो तेव्हा मला बहुसंख्य लोक शुभ्र कपडे वापरत असलेले दिसले, ह्यात पुरुषांप्रमाणे स्त्रियाही होत्या हे सर्व पाहून मला मोठी गंमत वाटली. या बहुतेक स्त्रिया हिंदू होत्या. त्या बाहेर जाताना पर्शिया अथवा तुर्कस्थानमधील स्त्रियांप्रमाणे बुरखा घेत नव्हत्या. 
        इतर अनेक गोष्टी मी येथे पाहिल्या. त्यातील एका गोष्टीबद्दल फार अचंबा वाटला. ती अशी की, जो तो मनुष्य एक प्रकारचे रक्तासारखे द्रव थुंकत होता. मला वाटले, याचे कारण या देशातील सर्व लोकांना हा एक रोग असावा. किंवा त्यांचे दात तरी तुटलेले असावेत. की, इथल्या लोकांची दात उपटून घेण्याची पद्धत आहे की काय ? या माझ्या सर्व शंकांच्या बद्दल मी एका इंग्रज बाईजवळ चौकशी केली. तिने मला सांगितले की हा काही कोणत्या रोगाचा परिणाम नाही. हे लोक एका विशिष्ट प्रकारची स्वादिष्ट पाने खातात. त्याचा हा परिणाम असतो. येथील भाषेत त्यांना 'पान' व पोर्तुगीज भाषेत 'बीटल' असे म्हणतात. तिने काही पाने मागवली. आपण स्वतः काही खाल्ली व मला काही खाण्यास दिली. ती खाल्ल्यावर माझे डोके इतके भणभणू लागले की मी आता मरणार, असे मला वाटू लागले. मी खाली कोसळलो आणि माझा चेहरा फटफटीत पडला. मला वेदना होऊ लागल्या. त्या बाईने माझ्या तोंडात मीठ टाकले; व मला शुद्धीवर आणले. हे पान प्रथमच खाणारावर असाच परिणाम होतो असे मग त्या बाईने मला सांगितले.
        'बीटल' अथवा 'पान' हे आयव्ही पानासारखे पण अधिक लांबट असते. हे औषधी आहे. आणि हिंदुस्थानात ते प्रत्येकजण खातो. ते सुपारी बरोबर चावून खातात. बरोबर थोडा काथ असतो. हा एका झाडाचा वाळलेला चीक आहे. पानाला थोडा काथ लावून ते सर्व एकत्र करून खातात. त्यामुळे ओठांना लाल भडक रंग येतो. तंबाखू खाणाराप्रमाणे लोकांना दिवसातून अनेक वेळा ते खाल्ल्याशिवाय रहावत नाही. हिंदुस्तानातील स्त्रियांचा गप्पागोष्टी सांगणे व पान खाणे हा मुख्य व्यवसाय असतो. आणि म्हणून त्यांना सारखे तोंडात पान असावे लागते.

तर मित्रांनो नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा इतिहासातील मजेशीर घटनेवर आधारित असलेला ब्लॉग, कमेंट करून नक्की कळवा..! 
धन्यवाद !

- रोहित पेरे पाटील
©इतिहासवेड

संदर्भ : storia do mogor by निकोलाय मनूची

1 टिप्पण्या