समस्त मराठी लोकांनी वाचावा असा लेख - सोशल मीडिया आणि इतिहास
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
तसं बघितलं तर तंत्रज्ञान आणि इतिहास या दोनही गोष्टी खूपच भिन्न आहेत, पण तंत्रज्ञानाचा आज आपण उपयोग आणि विकास बघितला तर तो प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आल्यामुळे सगळ्या गोष्टी सहज सोप्या होऊन गेल्या आहेत.हो की नाही !
तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला.
पण तंत्रज्ञान हे एक माध्यम आहे त्याचा वापर कसा करावा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.
सोशल मीडियाने तर जग जवळ आलंय असं म्हणतात, म्हणजे एका जागी बसून आपण जगभरातील लोकांच्या संपर्कात राहू शकतो.
सोशल मीडियाचा अनेक लोकं विधायक कामांसाठी वापर करतात. अनेक प्रकारची माहिती, तथ्य, वगैरे आपल्याला यातून मिळते.
व्हाट्सअपवर सध्या अनेक प्रकारची माहिती (अफवा) फिरत असते आणि मुख्य म्हणजे ती माहिती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी निगडित असल्याने आज या विषयावर मी विस्तृतपणे लिखाण करणार आहे,
सोशल मीडियावरील फॉरवर्ड होणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडिओस पुढील प्रमाणे
या आणि अशा अनेक पोस्ट्स आणि व्हिडिओस सर्रासपणे व्हायरल होत असतात आणि कहर म्हणजे अनेकजण जे स्वतः ला शिवभक्त म्हणवून घेतात ते याच गोष्टीला कुठलीही शहानिशा न करता खरा इतिहास मानून चालतात.
काय असतं या पोस्ट्स आणि व्हिडिओस मध्ये, तर वाचकांना खिळवून ठेवणारे भावनिक प्रसंग ते यामध्ये उभे करतात, डायलॉग्स आणि शेरो शायऱ्या यांच्या बळावर मोठमोठ्याने ओरडून खोट्याचं खरं केल्या जातं. महाराज कसे धर्मनिरपेक्ष होते याचा चाललेला अट्टहास आणि कुठेतरी सत्य इतिहासापासून घेतलेली फारकत.
आणि मुख्य म्हणजे ह्या पोस्ट्स सर्रासपणे फॉरवर्ड केल्या जातात. शिवभक्त होणं ही खरोखरंच अभिमानास्पद बाब आहे पण त्या वृत्तीला आपण कितपत साजेसं ठरतोय हे महत्त्वाचं आहे. ह्या पोस्ट्स आणि व्हिडिओलाच आपण जर खरा इतिहास मानून चालत असू तर येणाऱ्या पिढीला आपण काय इतिहास सांगणार आहोत ?
भडक मथळे, आणि भावनिक रंजकता या बळावर अनेकजण चुकीचा इतिहास पसरवत आहेत मग तो पोस्टसद्वारे असो किंवा व्हिडिओ द्वारे.
शरमेची गोष्ट म्हणजे आपल्या राजांचा खरा इतिहास आपल्यालाच माहीत नसतो. आपण फक्त कुणी महाराजांविषयी काही लिहलं तर भावनिक होऊन त्याच्यावर तुटून पडतो.
खरा शिवभक्त एखादा मुद्दा ऐतिहासिक समकालीन संदर्भाद्वारे खोडून काढतो.
बाकी सगळं जाऊ द्या बाहेरच्या एखाद्या माणसाने आपल्याला आपला इतिहास विचारला तर काय सांगणार आहोत आपण त्याला ? की त्याला पण डायलॉग्स मारून इतिहास सांगणार आहोत.
मान्य आहे प्रत्येक जण इतिहासाचा खोलवर अभ्यास नाही करू शकत. पण आपल्या महाराजांचा बेसिक इतिहास तर आपल्याला माहिती पाहिजे ना !
मागे युट्युबवर एकाने महाराजांविषयीचा मूलभूत इतिहासासंदर्भात प्रश्नावली तयार करून लोकांना (महाराष्ट्रातल्या) तो ते प्रश्न विचारत होता. पण जेवढ्या लोकांना त्याने प्रश्न विचारले त्यापैकी 99℅ लोकांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आलं नाही.
हे सगळं बघून वाटलं खरंच कुठं राहतो आपण, एकीकडे महाराजांचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे त्यांच्याविषयी बेसिक माहितीही आपल्याला नसते. आणि जी माहिती असते ती ह्या न त्या व्हाट्सअप पोस्टवरून, किंवा युट्युबवर ऐकलेली असते.युट्युबवरही अनेक अशी चॅनेल्स आहेत जी ससंदर्भ आणि खरा इतिहास सांगतात पण तिकडे कोणी फिरकत नाही कारण लोकं भडक मथळ्याचाच इतिहास बघतात.
अनेक जण जे स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतात, महाराजांचा मावळा म्हणवून घेतात त्यात चुकीचं असं काही नसून अभिमानास्पदच आहे पण आपल्याला महाराजांचा इतिहास कितपत माहीत आहे ? कित्येकांना अफजलखान वध, आग्रा भेट आणि राज्याभिषेक यापलिकडे महाराज माहीत नसतात, त्यांचं प्रशासकीय धोरण काय होतं, रयत या राज्याला आपलं राज्य का म्हणायची हे सगळं समकालीन कागदपत्रं वाचल्यावर कळतं.
काही फेसबुक समूह आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रश्नोत्तर स्वरूपात मांडून महाराजांचा खरा इतिहास समजून घ्यायला मदत होते. अनेकांना समग्र इतिहास वाचणं वेळखाऊ किंवा कंटाळवाणं वाटू शकतं, अशांना या ग्रुपच्या माध्यमातून अनेक प्रसंग माहीत होतात जे खरोखरच आजच्या काळात महत्त्वाचे आहे.
वाचा आणि विचार करा ! इतिहास (खरा) लिहणारा आणि सांगणारा हा तटस्थपणे लिहत असतो. तो जातपात बघून आणि भावनिक रंजकतेला थारा देत नाही.
त्यामुळे विचार करा, खरा इतिहास वाचा आणि खरे शिवभक्त व्हा !
✏️लेखन : रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड
1 टिप्पण्या
खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. अभिनंदन रोहित.
उत्तर द्याहटवा