वैभवशाली प्रतिष्ठाणनगरी अर्थात आपलं पैठण
नमस्कार मित्रांनो, जय शिवराय
आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग लिहतोय, त्याला कारणही तसंच आहे, दोन दिवसांपूर्वी पैठणला जाणं झालं आणि पैठणच्या वैभवाने मनाला भुरळच घातली. आजचा ब्लॉग हा काहीसा ऐतिहासिक, माहितीपर आणि पौराणिक अशा स्वरूपाचा असू शकतो, पैठणची ही माहिती एका ब्लॉगमध्ये मांडणं शक्य नाही त्यामुळे ब्लॉग काही भागांमध्ये सुद्धा प्रकाशित करेल कारण पैठणचं वैभव मोठं आहे.
प्रतिष्ठाण नगरी अर्थात आपलं पैठण. पैठणचा उल्लेख इ.स.पू. ४०० च्या सुमारास बौद्ध धर्मग्रंथातून आढळतात. सुप्तनिपात, अगुत्तरानुकाय, चुल्लकलिंग जातक इत्यादी ग्रंथांवरून अश्मक व मूलकांचा देश म्हणजे आजकालचे नगर, बीड आणि औरंगाबाद हे जिल्हे एकमेकालगत पैठण हे राजधानीचे शहर होते.
अशोकाच्या शिलालेखात (इ.स.पू. २७) पेतनिकाचा उल्लेख आढळतात. कन्नड तालुक्यात पितळ खोऱ्यातील बौद्ध लेण्यातून (इ.स.पू. २००) गंधित कुळातील मित्रदेवाने आणि संगत नावाच्या इसमाने दान दिल्याचे उल्लेख आहेत. सोयीच्या स्तुपातूनही प्रतिष्ठाणच्या रहिवासाचे उल्लेख आहेत.
इ.स.पू. ६० च्या सुमारास परिप्लस या इजिप्त मधील ग्रीक प्रवाशाने पैठण हे भरभराटीचे शहर भडाचहून २० दिवसांच्या टप्प्यावर असून येथे विविध प्रकारचे कापड तयार होतात असं नमूद करून ठेवलंय. पैठणचा प्राचीन उल्लेख प्रज्ञपुराणात येतो.
प्रतिष्ठाण नगरीला म्हणजेच पैठणला सुवर्णकाळ लाभला तो सातवाहनांच्या काळात, पैठण ही तत्कालीन सातवाहनांची राजधानी होती. त्या काळी सातवाहनांचा परकीय देशांशी व्यापार चालत होता हे सातवाहनांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते.
कला, संस्कृती, पांडित्य, साहित्य, व्यापार या क्षेत्रात पैठणची भरभराट सातवाहनांच्या काळात झाली.
सातवाहन कुळातील गौतमीपुत्र सातकर्णी अर्थात शालिवाहन हा सर्वात कर्तबगार राजा या भूमीत होऊन गेला.
आशियातील शक राजा नहुप याने जेव्हा सातवाहनांवर आक्रमण केलं तेव्हा नाशिक जवळ मोठं युद्ध झालं, या युद्धात शालिवाहन राजाने शकांचा मोठा पराभव केला, ते साल होतं इसवी सन ७८. या दिवशी शालिवाहन राजाने त्याच्या नावाचा शक सुरू करून (चैत्र शुद्ध प्रतिपदा, श्री नृप शालिवाहन शके १) या विजयाप्रित्यर्थ पैठण येथे एक तिर्थखांब उभारला जो आजही सातवाहन राजवटीच्या गतवैभवाची साक्ष देत उभा आहे.
शालिवाहन विजयस्तंभ/ तिर्थखांब
शालिवाहन राजांसंबंधी अनेक दंतकथा स्थानिकांमध्ये प्रचलित आहेत.
पैठणच्या इतिहासाचा सर्वांगीण आढावा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सध्याचं पैठण शहर हे जरी गजबजलेलं असलं तरी जुनं पैठण अजूनही त्यामानाने शांत आणि निवांत आहे. तिथं वाहतूक आणि गर्दीचा गोंगाट नाही, आहे ती फक्त निरव शांतता. जुन्या पैठणपासून अजून थोडं उंचावर जाऊ लागलं की वाटेत गर्द झाडी, पुरातन भग्न वाडे लागतात. त्या भागाला पालथीनगरी असं म्हणतात, स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असणाऱ्या एका दंतकथेप्रमाणे सध्याची पालथीनगरी ही शालिवाहन राजाची राजधानी होती म्हणजे शालिवाहन राजाचा राजवाडा आणि मुख्य राजधानीचं ते ठिकाण असल्याचं बोललं जातं, विजयस्तंभ/ तिर्थखांब देखील याच ठिकाणी आहे. पालथीनगरी यासाठी म्हणतात की काही शेकडो वर्षांपूर्वी इथं भूकंप झाला असल्याने भव्य वाडे आणि अवशेष जमिनीखाली गाडल्या गेलेत. काही लोकांनी द्रव्याच्या लोभापायी येथे खोदकाम देखील केले होते तेव्हापासून सरकारने हा भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलाय.
लिलाचे प्रस्थान या पोथीवरून १३ व्या शतकातील पैठणची कल्पना येते. पैठणचा उल्लेख अनेक ठिकाणी पोटनगर, पोतनगर, प्रतिष्ठान, प्रत्यस्थान असा येतो.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवून घेतले तो अतिप्राचीन नागघाट, शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज, त्यांचा वाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गोविंद भट कावळे आणि त्यांचे सध्याचे वंशज यांच्याविषयी विस्तृत माहिती आपण ब्लॉगच्या पुढील भागात पाहू...
धन्यवाद !
लेखन : रोहित पेरे पाटील
© इतिहासवेड
10 टिप्पण्या
Waiting for your next blog
उत्तर द्याहटवानक्कीच दादा, पुढील ब्लॉग लवकरच येईल, धन्यवाद😊🙏
हटवाछान माहिती आहे, लिहित रहा
उत्तर द्याहटवाधन्यवाद 😊🙏
हटवाVery interesting.. great
उत्तर द्याहटवाधन्यवाद दादा
हटवाKhup chhan mahiti dili thank you so much👍👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखुप धान माहिती आहे रोहित.
उत्तर द्याहटवाही माहिती वाचण्या आधी पैठण एक शहर वाट्टल होत पण आज इतिहास बगितला धन्यवाद खूप छान 🙏🏻
उत्तर द्याहटवा